लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कलामहर्षी केकी मुस आणि ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ स्व.ल.नि. छापेकर यांच्या गाढ मैत्रीच्या आठवणी ल.नि. छापेकर यांचे नातू आणि मू.जे. महाविद्यालयाचे माजी उपप्राचार्य प्रा. शरच्चंद्र छापेकर यांनी जपल्या आहेत. छापेकर यांच्या संग्रहात मुस यांनी काढलेली काही टेबलटॉप फोटो आणि इतर छायाचित्रेदेखील आहेत.
प्रा. शरच्चंद्र छापेकर यांनी सांगितले की, आमचा तीन पिढ्यांचा संबंध होता. मी त्यांना बाबुजी म्हणत असे. माझे आजोबा स्व. ल.नि. छापेकर आणि वडील मुकुंदराव छापेकर यांची कारकीर्द सुरू झाली आणि बहरली ती चाळीसगावलाच. त्यामुळे आमचे घनिष्ट संबंध होते. एका पारसी गर्भश्रीमंत परिवारातून आलेल्या मुस यांनीही चाळीसगावलाच आपली कर्मभूमी बनवले होते. जुलै १९७७ मध्ये चाळीसगावला बंकट हायस्कूलमध्ये कनिष्ठ व्याख्याता म्हणून माझी नियुक्ती झाली. त्यावेळी मला केकी मुस यांचे मोठे आकर्षण होते. मुस यांनी माझ्या आजोबांच्या एका फोटोला त्यांच्या प्रसिद्ध पाणी पिणाऱ्या घोड्याच्या फोटोसोबत जोडले होते. आणि म्हटले होते ‘जलतृष्णा आणि ज्ञानतृष्णा’. कार्टुन फोटोग्राफीमध्येदेखील त्यांचा हातखंडा होता. त्यात त्यांनी माझ्या आजोबांचे व्यंगचित्र काढले होते. हाताने व्यंगचित्र रेखाटून त्यात आजोबांचा फोटो जोडला होता.’
स्व. ल.नि. छापेकर हे बालभारतीचे संस्थापकदेखील होते. त्यावेळी सहावी आणि सातवीच्या पुस्तकांमध्ये ‘छायाचित्र आणि रसग्रहण’ म्हणून मुस यांची चित्रे प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यातूनच प्रथमच सामान्य भारतीयांना त्यांची ओळख व्हायला सुरुवात झाली.
एका छोट्याशा खोलीत राहूनदेखील त्यांनी आपले कार्य जगभर पसरवले होते. मात्र बालभारतीसह अन्य काही पुस्तकांमधून त्यांची चित्रे सामान्य मराठी वाचकांपर्यंत पोहोचली. त्यावेळी पाणी पिणारा घोडा आणि त्यासोबतच पाण्यात उठलेले जलतरंग हे चित्र तर कोंबडी आणि तिची पिले ही छायाचित्रे पुस्तकांमध्ये त्याच्या रसग्रहणासह प्रसिद्ध झाली आहेत.
प्रा. छापेकर यांचे वडील मुकुंदराव छापेकर यांनी मुस यांच्या चित्रांचे प्रदर्शन अमळनेरला भरवण्यात मोठा वाटा उचलला होता. त्याचीही आठवण प्रा. शरच्चंद्र छापेकर यांनी यावेळी सांगितली.
छापेकर यांनीही काढली मुस यांची छायाचित्रे
प्रा. छापेकर यांनी चाळीसगावला मुस यांच्या अखेरच्या दिवसांमध्ये त्यांची काही छायाचित्रे काढली आहेत. त्यावेळच्या नवीन कॅमेऱ्यावर त्यांनी दोन छायाचित्रे घेतली. ही त्यांची बहुधा अखेरची छायाचित्रे ठरली. त्यापैकी दोन चित्रे आजही छापेकर यांनी जपून ठेवली आहेत. तर मुस यांनीही तीन पिढ्यांच्या ज्ञानतृष्णेचे छायाचित्र घेतले आहे.