भूषण श्रीखंडे, जळगाव: मध्य रेल्वे मार्गावरील भुसावळ ते मनमाड दरम्यान तिसरी रेल्वे लाईन तसेच भुसावळ ते जळगाव दरम्यान चौथ्या रेल्वे लाईनचे गेल्या काही वर्षांपासून काम सुरू आहे. तिसऱ्या रेल्वे लाईनवर पाचोरा ते नांदगावपर्यंत काम बाकी आहे. मुख्य अप आणि डाऊन रेल्वे लाईनवरील धावणाऱ्या प्रवासी गाड्यांच्या व्यस्त वेळापत्रकामुळे मेमू गाड्यांसह अनेक गाड्यांना दुसऱ्या गाड्यांना पुढे जाऊ देण्यासाठी थांबावे लागते. त्यामुळे या गाड्यांना उशीर होत असल्याने नवीन टाकण्यात आलेल्या या रेल्वे लाईनचा उपयोग करावा, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.
भुसावळ ते जळगाव चौथ्या रेल्वे लाईनचे काम पूर्ण झाले आहे, तर पाचोरा ते नांदगाव दरम्यान तिसऱ्या रेल्वे लाईनवरील पुलांचे काम बाकी असल्याने ते अपूर्ण आहे. काही दिवसांपूर्वी नांदगाव ते मनमाडपर्यंत तिसऱ्या रेल्वे लाईनवर १३० च्या वेगाने गाड्या धावण्याची चाचणी घेण्यात आली आहे. भुसावळ ते मनमाड दरम्यानची तिसरी, तर भुसावळ ते जळगावपर्यंत झालेल्या चौथ्या रेल्वे लाईनवर अद्याप फक्त मालगाड्या चालविल्या जात आहेत.
मेमूसह काही गाड्यांना होतो उशीर..
भुसावळ येथून धावणाऱ्या मेमू गाड्यांना त्यांच्या वेळेत काही गाड्यांना पुढे जाऊ देण्यासाठी एक ते दोन ठिकाणी अर्धा तासापर्यंत थांबावे लागते. त्यामुळे मेमू गाडीने दैनंदिन प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या कामाचे वेळापत्रक कोलमडत आहे. तसेच प्रवाशांना एक ते दोन तास उशीर होत असल्याने मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यामुळे तिसऱ्या तसेच चौथ्या रेल्वे लाईनचादेखील प्रवासी गाड्यांसाठी वापर करावा अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.
तिसऱ्या रेल्वे लाईनवर दोन वेळा चाचणी
भुसावळ ते मनमाडपर्यंतच्या तिसऱ्या लाईनचे पाचोरा ते नांदगावपर्यंतचे काम बाकी आहे, तर नांदगाव ते मनमाड दरम्यानच्या या लाईनवर १३० किमी वेगाने रेल्वेगाडी धावण्याची चाचणी घेण्यात आली आहे. तसेच महिन्यातून दोन वेळा या तिसऱ्या रेल्वे लाईनवर चाचणी मध्य रेल्वेकडून घेतली जात आहे.