लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असला तरी शहरातील मुख्य बाजारपेठेत गर्दी कमी होताना दिसून येत नाही. शुक्रवारी अक्षयतृतीया व रमजान ईद च्या सुट्टी निमित्त शहरातील मुख्य बाजारपेठ परिसरातील अनेक दुकाने लपून छपून उघडे असल्याचे चित्र पहावयास मिळाले.
शहरातील मुख्य बाजारपेठ परिसरातील गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी मनपा अतिक्रमण निर्मूलन विभागाचे व पोलिसांचे पथक शहरात कार्यरत आहे . मात्र, शुक्रवारी अक्षयतृतीया व रमजान ईद निमित्त सुट्टी असल्याने मनपाचे पथक शुक्रवारी शहरात तैनात झालेले नव्हते. त्यामुळे सुट्टीचे औचित्य साधत अनेक व्यापाऱ्यांनी लपून छपून व्यवसाय सुरू ठेवले. अनेक दुकानांमध्ये ग्राहकांची मोठी गर्दी झाली होती. यासह बळीराम पेठ, सुभाष चौक , शिवाजी रोड परिसरात अनेक कपड्यांची दुकाने देखील उघडे होते.
पत्रे तोडून फुले मार्केटमध्येही व्यवसाय सुरू
महापालिका प्रशासनाने शहरातील महात्मा फुले मार्केट मधील दुकाने बंद करण्यासाठी मुख्य प्रवेशद्वारांवर पत्रे लावण्यात आले होते. मात्र, शुक्रवारी अनेक फेरीवाल्यांनी व काही विक्रेत्यांनी पत्र्याचे शेड तोडून आत प्रवेश करून आपले व्यवसाय सुरू केल्याचे चित्र फुले मार्केट परिसरात दिसून आले. तसेच अनेक दुकानांमध्ये २० हून अधिक ग्राहक देखील असल्याची माहिती फुले मार्केटमधील काही व्यावसायिकांनी दिली आहे.
रस्त्यांवरही थाटला गेला व्यवसाय
शहरातील मुख्य बाजारपेठ परिसरासह व मुख्य चौक परिसरात देखील अनेक दुकानदारांनी व्यवसाय थाटला होता. तसेच या ठिकाणी ग्राहकांची देखील मोठ्या प्रमाणात गर्दी आढळून आली. बळीराम पेठ परिसरात सायंकाळी पाच वाजेनंतर बाजाराचे स्वरूप प्राप्त झाले होते. मनपाच्या काही कर्मचाऱ्यांनी फेरफटका मारत हा भाजीपाला बाजार उठवला मात्र काही वेळातच मनपाचे पथक गेल्यानंतर पुन्हा या ठिकाणी बाजाराला सुरुवात झाली होती.