जळगाव : रविवारी संध्याकाळपर्यंत संपूर्ण लॉकडाऊनचा निर्णय झाल्यास महाराष्ट्रातील व्यापाऱ्यांनी त्यात सहभागी होण्याचा निर्णय झाला असून, संपूर्ण लॉकडाऊन न झाल्यास ८ रोजी झालेल्या बैठकीत ठरलेल्या निर्णयानुसार सोमवारपासून व्यापार सुरू करण्याचा निर्णय कायम राहणार आहे, अशी माहिती राज्य कॅट संघटनेचे उपाध्यक्ष दिलीप गांधी यांनी दिली.
महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री ॲण्ड ॲग्रिकल्चरतर्फे १० एप्रिल रोजी ‘लॉकडाऊन व ब्रेक द चेन, पुढे काय?’ या विषयावर चर्चा करून निर्णय घेण्यासाठी राज्यातील सर्व व्यापारी संघटनांच्या पदाधिकारी व व्यापारी सभासदांची अध्यक्ष संतोष मंडलेचा यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाइन बैठक झाली. त्यावेळी ही चर्चा झाली. यात गांधी यांनी कोरोनाचे संक्रमण वाढत आहे, अशा परिस्थितीत आपले थोडे नुकसान सहन करून संक्रमण साखळी तोडण्यासाठी शासनास सहकार्य करावे व संपूर्ण लॉकडाऊन झाल्यास त्याला सहकार्य करण्याचे आवाहन केले. छोट्या व्यापाऱ्यांना आर्थिक पॅकेजची मागणीदेखील करण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले.