जळगाव : मालवाहू वाहनातून गुरांची निर्दयीपणे वाहतूक करुन या जनावरांच्या जीवाशी खेळणाऱ्या नाजीम शेख नजीर शेख (२६), नोयद शेख नजीर शेख (२५) गाडी चालक नदीम शेख नईम शेख (२८) व बशीर उर्फ चड्डा सुपडू शेख कुरेशी (सर्व रा.वरणगाव) या चौघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुरुवारी दुपारी वरणगाव परिसरात पकडले. दरम्यान, पोलिसांनी वेळीच कारवाई केल्यामुळे मोठा अनर्थ टळला.वरणगाव शिवारात गुरांची निर्दयीपणे वाहतूक होत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बापू रोहोम यांना मिळाली होती. सध्या जिल्ह्यात प्रतिबंधात्मक व जमावबंदी कायदा लागू असल्याने या घटनेमुळे वाद होण्याची शक्यता लक्षात घेता पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले यांनी तातडीने स्थानिक गुन्हे शाखेचे पथक वरणगावला रवाना केले. या पथकाने मिळालेल्या माहितीच्या आधारावर सापळा लावून मालवाहू वाहन अडविले असता त्यात जनावरे कोंबून भरली होती. या वाहनासह त्यातील चौघांना वरणगाव पोलीस ठाण्यात नेण्यात आले. तेथे चौघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून अटक करण्यात आली आहे. या जनावरांना कुसुंबा येथील गो शाळेत पाठविण्यात आले आहे.वरिष्ठ पोलीस निरीक्षक बापू रोहोम, सहायक फौजदार रमेश जाधव, शरद भालेराव, जितेंद्र पाटील, संजय सपकाळे, सुधाकर अंभोरे, अशरफ शेख, राजेश मेढे, संजय हिवरकर, सूरज पाटील, प्रमोद लाडवंजारी, किरण धनगर व मुरलीधर बारी यांच्या पथकाने ही कारवाई केली.