लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव - गेल्या काही वर्षांपासून होत असलेल्या वातावरण बदलाचे परिणाम ऋतुंवरदेखील होत जात आहे. जिल्ह्यात गेल्या दोन वर्षांपासून पावसाच्या सरासरीत मोठी वाढ झाली आहे. तर हिवाळ्यातील ऋतूमान देखील बदललेले आहे. नेहमी नोव्हेंबर ते जानेवारी महिन्यात गारठवणारी थंडी यंदा या महिन्यात गायबच होती. मात्र, या तीन महिन्यात गायब झालेली थंडी फेब्रुवारी महिन्यात आपला कहर दाखविताना दिसत आहे. फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या दिवसापासून तापमानात मोठी घट झाली असून, आठवडाभरापासून किमान तापमान १२ अंशाच्या खाली आहे. यामुळे जळगावकरांना थंडीने चांगलेच गारठवले आहे. सोमवारी जळगाव शहराचा पारा १० अंशापर्यंत खाली आला होता.
नोव्हेंबर ते जानेवारी महिन्यात अरबी व बंगालच्या उपसागराकडून सातत्याने बाष्पयुक्त वारे उत्तरेकडे वाहत होते. यामुळे उत्तरेकडून येणारे थंड वाऱ्यांना पूर्णपणे अडकाव झाला. यामुळे यंदा थंडीचा कहर कमी झाला होता. मात्र, हिमालयात सुरू असलेली बर्फवृष्टी त्यातच महाराष्ट्रात झालेले कोरडे हवामान यामुळे उत्तरेकडील थंड वारे पुन्हा सक्रिय झाले आहेत. यामुळे गेल्या आठवडाभरापासून थंडीचा कहर वाढला आहे. जिल्ह्यात साधारणपणे फेब्रुवारी महिन्यात थंडी परतीच्या मार्गावर असते. मात्र, यंदा फेब्रुवारीतच तापमानाचा पारा खाली जात आहे. तसेच आगामी काही दिवस किमान तापमान स्थिर राहणार असून, कमाल तापमानात काही प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे.