किमान तापमानातही वाढ : उष्णतेची लाट वाढणार
जळगाव, दि.26 - शहराच्या तापमानात आता दिवसेंदिवस वाढ होत असून, रविवारी जळगावच्या तापमानाने चाळीसी गाठल्याने जळगावकर उकाडय़ाने त्रस्त झाले आहेत. रविवारी शहराचे तापमान 40.4 अंश इतके होते. तसेच पुढील आठवडय़ात शहराचे तापमान 42 ते 44 अंशावर जाण्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आहे.
तापमानवाढीचा परिणाम शहरात दिसून येत असून दुपारच्या वेळेस शहरातील रस्ते ओस पडले होते. संध्याकाळी 5 वाजेर्पयत उन्हाच्या झळा कायम राहत असल्याने 6 वाजेनंतरच नागरिक बाजारात येणे पसंत करत आहेत. रविवारी शहराच्या तापमानाने चाळीसी गाठल्याने घरात दिवसभर कुलर, पंखे सुरु झाले आहेत.
किमान तापमान 19 अंशावर
कमाल तापमानाप्रमाणेच किमान तापमानात देखील वाढ होत असून, रविवारी 19.6 अंश इतक्या किमान तापमानाची नोंद घेण्यात आली आहे. यामुळे रात्रीदेखील उकाडा जाणवित आहेत. लाही-लाही करणा:या उन्हापासून बचावासाठी व घशाला पडणारी कोरड शमविण्यासाठी लिंबू सरबत, उसाचा रस, मठ्ठा अशी थंडपेय पिण्यासाठी रस्त्यालगतच्या हातगाडय़ांसह रसवंतिगृहांमध्ये गर्दी पाहावयास मिळत आहे.
महावितरणचा ‘शॉक’
सध्या दिवसेंदिवस वाढत असलेल्या उकाळ्यामुळे नागरिक हैराण आहेत. त्यातच महावितरणकडून दुरस्तीच्या नावाखाली शहरातील विविध भागात चार ते पाच तास वीजपुरवठा खंडीत होत आहे. जळगाव तालुक्यातील ग्रामीण भागात देखील दिवसभरात चार ते पाच तास वीजपुरवठा खंडीत केला जात आहे.
तापामानात होणार वाढ
मार्च महिन्यात जळगावच्या तापमानाने चाळीसी पार केल्यामुळे नागरिकांना एप्रिल व मे महिन्याची भिती वाटत आहे. यंदाचा उन्हाळा अधिक त्रासदायक असल्याचा इशारा हवामान खात्याकडून आधीच देण्यात आला आहे. तसेच पुढील आठवडय़ात जळगावचा पारा 42 ते 44 अंशावर जाण्याचा अंदाज आहे.