सुभाष चौक, बळीराम पेठ भागात ४५ हॉकर्सवर कारवाई : पिंप्राळा बाजारही उठवला
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : महापालिकेने निश्चित करून दिलेल्या नऊ जागांवरच व्यवसाय करण्यास मनपा प्रशासनाने मंजुरी दिली असून, शहरातील मुख्य रस्त्यांलगत दुकाने थाटणाऱ्या विक्रेत्यांवर मनपा अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या पथकाकडून कारवाईची मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्यानुसार बुधवारी अक्सानगर भागातील बुध बाजार, तर पिंप्राळा बाजार मनपाच्या पथकाकडून उठविण्यात आला आहे. मात्र, निवृत्तिनगरात गेल्या काही आठवड्यांप्रमाणे बुधवारीदेखील मोठा बाजार भरला. यामुळे एकीकडे मनपाकडून कारवाई होत असताना, दुसरीकडे हॉकर्स मात्र शहरातील नवनवीन जागांचा शोध घेऊन नवीन बाजार भरविताना दिसून येत आहेत.
मनपा प्रशासनाने शहरातील मुख्य बाजारपेठ परिसरात पुढील सहा महिने हॉकर्सला व्यवसाय करण्यास बंदी घातली आहे. मात्र, हॉकर्सदेखील मनपाच्या पथकाला एकप्रकारे आव्हान देत मिळेल त्याठिकाणी जागा करून आपला व्यवसाय सुरू करत आहेत. बुधवारीदेखील शहरातील मुख्य बाजारपेठ परिसरातील सुभाष चौक, बळीराम पेठ, फुले मार्केट परिसरात अनेक विक्रेत्यांनी दुकाने थाटली होती. यामुळे बाजारपेठेत पुन्हा गर्दी झाली होती. याबाबतची माहिती मिळताच मनपा अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या पथकाने बाजारात येऊन हॉकर्सवर कारवाईची मोहीम हाती घेण्यात आली.
४५ हॉकर्सच्या हातगाड्या जप्त
मनपा अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या पथकाने बुधवारी सुभाष चौक, फुले मार्केट भागात ४५ हॉकर्सवर कारवाई करून हातगाड्या जप्त केल्या आहेत. तसेच अनेक हॉकर्सचा मालदेखील मनपाने ताब्यात घेतला आहे. या कारवाईदरम्यान अनेक विक्रेते व मनपा कर्मचाऱ्यांमध्ये वाद झाला. या वादामुळे या ठिकाणचे वातावरण काही काळ तणावाचे झाले होते. शनिपेठ व शहर पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी कारवाई करून, हा वाद शांत केला.
बुध बाजारही बसूच दिला नाही
शहरातील अक्सा नगरात भरणारा बाजारदेखील मनपा अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या पथकाने बसू दिला नाही. सकाळी ७ वाजेपासून एसआयडीसी पोलीस स्टेशनचे कर्मचारी व मनपा कर्मचारी ठाण मांडून होते. याठिकाणी अनेक विक्रेते आले मात्र एकाही विक्रेत्याला याठिकाणी व्यवसाय करू देण्यात आला नाही. दरम्यान, निवृत्तिनगर भागाकडे मनपाने दुर्लक्ष केल्यामुळे बुधवारी या भागात मोठा बाजार भरला. याठिकाणी ३०० हून अधिक विक्रेत्यांनी दुकाने थाटल्यामुळे नागरिकांची तुफान गर्दी झाली होती. दुपारी मात्र अनेक विक्रेत्यांनी मनपाने निश्चित करून दिलेल्या मानराज पार्कच्या जागेवर दुकाने थाटली, तर पिंप्राळा बाजाराच्या ठिकाणीही मनपाने तगडा बंदोबस्त केल्यामुळे याठिकाणीही बाजार भरू देण्यात आला नाही.