अध्यात्माचा उपदेश करता करताच संतानी प्रपंचाविषयी काही मौलिक उपदेश समाजाला केला आहे. मानवता धर्माला अनुसरून सामाजिक आणि धार्मिक गोष्टींना अध्यात्माच्या कोंदणात बसवून नैतिकतेचा संदेश दिला आहे. दया, क्षमा, शांती आणि प्रेम या सद्गुणांची रूजवात समाजमनावर होण्यासाठी संतांनी जाणीवपूर्वक प्रयत्न केले. आज जगात हिंसेचे थैमान सर्वत्र सुरू आहे. एखाद्याच्या मृत्यूबाबत हळहळ वाटण्याऐवजी त्या अपघाताचे फोटो काढून सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. यामागे भुतदयेची भावना होती की अत्यंत बिभत्स अशी विकृतीची भावना होती? हे आपण सहज ओळखू शकतो. संवेदना बोथट झाल्याच्या या खुणा आहेत. माणसाला आपल्या माणुसपणाचे भान नव्याने करून देण्यासाठी मानवाचे दानवाच्या दिशेने होणारे हे पतन थांबवण्यासाठी आणि देवत्वाकडे उत्थान होण्यासाठी आज संत वाड;मयाची आवश्यकता आहे.‘दया’ या शब्दाचा अर्थच काळाच्या ओघात बदलून गेला आहे. दया म्हणजे एखाद्याबद्दल वाटणारी कीव, दीन- दुखिता विषयीची कणव असा अर्थ आपण घेतो. दया शब्दाचा मुळ अर्थ आहे प्रेम. आत्यंतिक जिव्हाळा, संत वाड;मयात याच अर्थाने हा शब्द आला आहे. ‘दया करणे जे पुत्रासी’ याचा अर्थ पुत्रप्रेम असा होतो. म्हणून भुतदया म्हणजे प्राणिमात्रांबाबतचे निरपेक्ष प्रेम. आत्यंतिक माया असे प्रेम हृदयात असले तर हिंसेचा विचार ही मनाला शिवणार नाही. पर्यावरण रक्षणासाठी वाघापासून मुंगीपर्यंतचे पर्यावरण साखळीतले सर्व जीव महत्वाचे आहेत. या वन्यजीवांना वाचवण्यासाठी व्यापक मोहिमांचे नियोजन सुरू आहे. तुकोबाराय सहजपणे सांगून जातात. ‘मुंगी आणि राव आम्हा स्तरिखाची जीव’ मुंगीला ही जीव आहे. तिलाही वेदना होऊ शकतात. शिष्यांना उपदेश देऊन महानुभाव संतांनी केला तो यामुळेच. मग प्राण्यांची शिकार करणे, मांस खाणे, हिंसा करणे या गोष्टी दुरच.निसर्ग आपले संतुलन आपण राखेल. आपण भुतदया म्हणजे प्राणीमात्रांबद्दल प्रेम बाळगावे. गायींचे पालन करावे. गोसेवा करावी. गोरक्षणासाठी हातात शस्त्र घेण्याची गरज नाही. क्षमा शस्त्र जया नराचिये हाती । दूष्ट तया प्रती काय करी? हा तुकोबांचा सवाल आहे. वन्य जीवांची तहान भागण्यासाठी रानातच पाण्याचे साठे असले पाहिजेत. तान्हेल्या जीवन वनामायी, रानात अन्न आणि पाणी मिळाले. सुरक्षीत अधिवास मिळाला तर हे वन्यजीव मानवी वस्तीत कशाला येतील? किती महत्वाचा आणि दूरदृष्टीचा विचार संतांनी दिला आहे.- प्रा. सी.एस.पाटील, धरणगाव.
दया... करणे जे पुत्रासी...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2019 11:49 PM