लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शालेय स्तरावरील सर्वच परीक्षा रद्द झाल्यामुळे विद्यार्थी व पालक नाउमेद होत आहेत, अशा काळात इस्रोला जाण्याची संधी नोबेल फाउंडेशनने उपलब्ध करून दिली आहे. जुलै महिन्यात नोबेल सायन्स टॅलेंट सर्च परीक्षा घेतली जाणार आहे. या परीक्षेत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना इस्त्रोची वारी करता येणार आहे.
विज्ञान व संशोधन क्षेत्राबाबत विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण व्हावी यासाठी नोबेल फाउंडेशन ही संस्था कार्यरत आहे. ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थ्यांना भारतीय अवकाश संशोधन संस्था (इस्रो), आयआयटी, आयआयएम यासारख्या उच्च शिक्षण संस्था अनुभवता याव्यात तसेच विज्ञान व गणित या विषयाचा पाया पक्का व्हावा यासाठी नोबेल फाउंडेशनतर्फे नोबेल सायन्स टॅलेंट सर्च परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. या परीक्षेसाठी संबंधित संस्थेच्या संकेतस्थळावर नोंदणी करावयाची आहे. अर्ज करण्याची अंतिम मुदत २५ मे असणार आहे, तर परीक्षा जुलै महिन्यात होणार आहे. मागील वर्षी या परीक्षेद्वारे ५७ विद्यार्थ्यांची इस्रो, आयआयटी सहलीसाठी निवड झाली होती. तसेच गुणवत्ता यादीत प्रथम ३०० विद्यार्थ्यांना पुस्तके व विज्ञान खेळणी बक्षीस दिली जाणार आहे. सदर परीक्षेसाठी पाचवी ते सातवी, आठवी ते दहावी आणि अकरावी, बारावी, डिप्लोमा असे तीन गट करण्यात आले आहेत, तिन्ही गटांसाठी स्वतंत्र प्रश्नपत्रिका असून परीक्षेचे स्वरूप वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाचे असणार आहे. विद्यार्थ्यांनी यात सहभाग नोंदवावा, असे आवाहन जयदीप पाटील, संतोष पवार यांनी केले आहे.