लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शुक्रवारी एका महिलेने एका मत्सासारखी घडण असलेल्या दुर्मिळ बाळाला जन्म दिला. दुदैवाने या बाळाच्या वाट्याला अवघ्या बारा तासांचे आयुष्य आले. खान्देशातील कदाचित हे असे पहिलेच बाळ असेल, असा दावा केला जात आहे. शनिवारी पहाटे या बाळाचा मृत्यू झाला, मात्र, दुर्मिळ असल्याने अभ्यासाठी त्याचा मृतदेह शरीररचनाशास्त्र विभागात ठेवण्यात आला आहे.
धरणगाव तालुक्यातील एका गावातील एका महिलेला शुक्रवारी दुपारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दुपारी ४ वाजता महिलेला प्रसूती कळा सुरू झाल्यानंतर स्त्रीरोग विभागप्रमुख डॉ. संजय बनसोडे आणि डॉक्टरांनी या महिलेची प्रसूती केली. प्रसूती होत असताच एका विचित्र घटनेचा प्रत्यय डॉक्टरांना आला. या बाळाची घडण अत्यंत दुर्मिळ असल्याचे डॉक्टरांच्या लक्षात आले. महिलेची स्थानिक पातळीवर उपचारही सुरू होते, शिवाय सोनोग्राफीही करण्यात आली होती. मात्र, त्यात काही समोर आले नव्हते. दरम्यान, बाळाचा मृत्यू झाल्याने कुटुंबीयांनाही मोठा धक्का बसला आहे.
काय होते व्यंग?
या बाळाच्या पोटाखालील पूर्ण भाग हा एकत्रित चिकटलेला होता. दोघे पाय एकमेकांना चिकटून या बाळाला एकच पाय होता. अगदी मत्सासारखी त्याची घडण होती. पोटाखाली संपूर्ण भागात व्यंग होते. शिवाय बाळाला किडनी नव्हती, या व्यंगाला वैद्यकीय भाषेत सिरोनोमेलीया म्हटले जाते. अर्थात मत्सपरी अशा प्रकारची बालके ही अगदीच अति दुर्मिळ पद्धतीने जन्माला येत असतात आणि त्यांचे जीवनमान हे अगदीच काही तासांचे असते, हे बाळ तरी बारा तास जिवंत होते, अशी माहिती महाविद्यालयांतील स्त्री रोग विभागप्रमुख डॉ. संजय बनसोडे यांनी दिली.
बाळाला असे व्यंग का?
तज्ञांच्या मते हा पर्यावरणीय व जनुकीय परिणाम असू शकतो. याबाबत ठोस पुरावे नसले तरी हा प्राथमिक अंदाज असू शकतो, तर बाळाची मातेच्या पोटात जडघडण होत असताना बाळाच्या धमन्यांना सुरळीत रक्तपुरवठा न झाल्याने अशा प्रकारचे व्यंग येण्याची शक्यता असते, आंबेजोगाई येथे असतानाही अशाच प्रकारे एका दुर्मिळ बाळाचा जन्म झाला होता. ते बाळ अवघ्या पंधरा मिनटांतच दगावले होते, जळगावात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय झाल्यापासून किंवा खान्देशातील कदाचित ही पहिलीस केस असेल, असे डॉ. बनसोडे यांनी सांगितले.