लोकमत न्यूज नेटवर्कजळगाव : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर बंद झालेले देशी दारूदुकान व बीअरबार रहिवाशी वस्तीत स्थलांतरित झाल्याने, म्हसावद येथे नागरिकांनी त्याला विरोध दर्शवत दोन्ही दुकानांची तोडफोड केली. जवळपास तीनशे महिला व दोनशे पुरुष यांच्या जमावाने रविवारी रात्री दुकानांवर हल्लाबोल केला. या आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या चार जणांवर एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.म्हसावद येथे शेखर सोनवणे यांचे देशी दारूचे दुकान व किशोर चौधरी यांच्या मालकीचे बार हे मुख्य रस्त्यावरून बोरनार रस्त्याच्या इंदिरा नगर भागात स्थलांतर झाले. धार्मिक स्थळ याच भागात असल्याने रहिवाशांचा दोन्ही दुकानांना विरोध होता. त्यानंतरही दुकान सुरूझाल्याने रविवारी रात्री आंदोलकांनी दुकानातील नोकरांना मारहाण करत साहित्याची तोडफोड केली. एमआयडीसी पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक सचिन बागुल यांचे पथक तातडीने घटनास्थळी आले. सोमवारी दिवसभर या भागात वरिष्ठ अधिकारी ठाण मांडून होते. गावात अद्यापही तणाव आहे.
म्हसावदला वस्तीतील दारूचे दुकान फोडले
By admin | Published: May 09, 2017 2:06 AM