ऑनलाईन लोकमत
जळगाव, दि.5 : राष्ट्रीय महामार्गावर अग्रवाल हॉस्पिटलच्या परिसरात रस्त्यावर वास्तव्य करणा:या पाथरकर कुटुंबाच्या सात वर्षीय मुलीला टेम्पो चालकाने मध्यरात्री झोपेत असताना अपहरण केल्याची घटना उघडकीस आली आहे. या मुलीला जाग आल्यानंतर आपण एका वाहनात असल्याचे लक्षात येताच तिने जोरदार किंचाळ्या मारायला सुरुवात केली. या किंचाळ्यांमुळे पकडल्या जाण्याच्या भीतीने टेम्पो चालकाने एरंडोल जवळ तिला रस्त्यावर सोडून पलायन केले.
कंडारी, ता.भुसावळ येथील मुळ रहिवाशी असलेले भिका फकीरा जाधव यांचा दगडापासून पाटे, वराटे बनविण्याचा व विक्रीचा व्यवसाय आहे. 30 मे रोजी भिका जाधव हे प}ी विमल, मुलगी आरती व अन्य नातेवाईकांसह जळगावात आले. महामार्गावरील अग्रवाल चौकाजवळील रस्त्याला लागून असलेल्या मोकळ्या जागेत त्यांनी बस्तान मांडले होते. दिवसभर काम करुन रात्री त्याच जागेवर हे कुटुंब झोपते. शनिवारी नेहमीप्रमाणे रात्री दहा वाजता हे कुटुंब झोपून गेले होते.
आरती हिची आई विमलबाई या रात्री 2 वाजता झोपेतून उठल्या असता मुलगी जागेवर नव्हती. त्यांनी तातडीने पतीला उठवले व परिसरात मुलीचा शोध घेतला, मात्र उपयोग झाला नाही. पहाटे तीन वाजता रामानंद नगर पोलिसांकडे जावून त्यांनी मुलगी गायब झाल्याची माहिती दिली. त्यानंतरही हे कुटुंब मुलीचा शोध घेत होते.
मध्यरात्री एकटी मुलगी महामार्गावर रडत असल्याचे पाहून दग्र्याजवळ असलेल्या काही लोकांना तिची चौकशी केली असता तिने ‘आपबिती’ कथन केली. पिंपळकोठा येथील एका जणाने एरंडोल पोलिसांना घटनेची माहिती देवून मुलीला त्यांच्या ताब्यात दिले.रात्रभर ही मुलगी घाबरलेल्या अवस्थेत पोलीस स्टेशनला थांबली.
एरंडोल पोलिसांनी केलेल्या चौकशीत मुलीने अचूक माहिती दिली. त्यामुळे त्यांनी सकाळी साडे अकरा वाजता रामानंद नगर पोलिसांना फोन करुन या मुलीबाबत माहिती दिली.