जळगाव : येथील औद्योगिक वसाहतीत तीन ठिकाणी ॲन्टिजन चाचणी केंद्र सुरू करण्यात आली आहेत. त्यात जिंदा भवन, एमआयडीसी कार्यालयाच्या समोरील एका खासगी कंपनीजवळ आणि एका बहुराष्ट्रीय कंपनीच्या प्लांटमध्ये हे कोरोना चाचणी केंद्र सुरू करण्यात आले आहे. शासनाच्या निर्देशानुसार औद्योगिक वसाहतीत काम करणाऱ्या कामगारांचीही ॲन्टिजन चाचणी केली जात आहे. त्यात ही केंद्रे सुरू करण्यात आली आहेत.
अकरा वाजतानंतरही भाजी विक्री सुरूच
जळगाव : जिल्हा प्रशासनाच्या आदेशानुसार ११ वाजतानंतर संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे ११ वाजताच्या आत आवश्यक सेवांनादेखील बंद करण्यात आले. फळे आणि भाजीची विक्री ११ वाजतानंतर बंद होणे अपेक्षित आहे; मात्र तरीदेखील गणेश कॉलनी भागात दुपारी दोनच्या सुमारास काही फेरीवाले भाजीपाल्याची विक्री करीत होते.
उद्योग केंद्रासमोर मातीचे ढीग
जळगाव : महामार्गाचे काम सुरू असल्याने जिल्हा उद्योग केंद्रासमोर मातीचे ढीग टाकून ठेवण्यात आले आहेत. हे ढीग बऱ्याच दिवसांपासून तसेच पडलेले असल्याने त्याचा उद्योग केंद्रात येणाऱ्यांना त्रास होत आहे; मात्र महामार्ग प्राधिकरण आणि कामाचा ठेकेदार त्याकडे लक्ष देण्यास तयार नसल्याचे दिसून येत आहे.