लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : एमआयडीसीतील गोदाम फोडणारी टोळी पोलिसांनी जेरबंद केली आहे. उमेश ऊर्फ साई सोनाजी आठे (वय ३०), सोनूसिंग ऊर्फ सोन्या रमेश राठोड (२२), दिनकर ऊर्फ पिन्या रोहिदास चव्हाण (२२, तिघे रा. सुप्रीम कॉलनी) व रिजवान शेख इस्लाम (४२, बागवान मोहल्ला, नवी पेठ) अशी चौघांची नावे आहेत.
एमआयडीसीतील एफ ४३ येथे कुणाल शांताराम मेतकर (३०, रा. चैतन्य नगर, जळगाव) यांच्या मालकीचे विना फुड्स नावाचे गोदाम आहे. २८ मार्च ते १ एप्रिल या कालावधीत हे गोदाम बंद होते. या काळात गोदाम फोडून एजीट्रेटर, सेप्रेटर, वाॅटर पंप, स्टील कंट्रोल पॅनल, आदी १ लाख ६० हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लांबविला होता. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. या गोदामात उमेश आठे याच्यासह चौघांनी चोरी केल्याची माहिती पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी तपास अधिकारी अतुल वंजारी, गफूर तडवी, हेमंत कळसकर, इम्रान सय्यद, किशोर पाटील, सचिन पाटील, योगेश बारी, मुदस्सर काझी व सतीश गर्जे यांचे पथक नेमून संशयितांचा शोध घेतला. सोमवारी चौघांना अटक करण्यात आली. दुपारी त्यांना न्यायालयात हजर केले असता न्या. ए. एस. शेख यांनी १० जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
मराठेंच्या कंपनीतही केली चौकडीने चोरी
या टोळीकडून गुन्ह्यात वापरलेली रिक्षा व बॉयलर गॅस बर्नर असा एक लाख तीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. त्याशिवाय लोकेश आनंदराव मराठे (रा. मेहरुण तलाव) यांच्या चटई व ठिबकचे दाणे बनविण्याच्या कंपनीतील संगणक व सीसीटीव्ही संपूर्ण सेट हस्तगत करण्यात आला आहे. या चौघांनीच तेथे चोरी केल्याचे उघड झाले आहे. यात रोकडही लांबविण्यात आली होती. या चोरीची तक्रार मराठे यांनी ५ मे रोजी एमआयडीसी पोलीस ठाण्यात केली होती. मात्र, पोलिसांनी गुन्हा दाखल केला नव्हता. ‘लोकमत’ने याबाबत वृत्त प्रकाशित केले होते.
पिन्याविरुद्ध तब्बल १२ गुन्हे
अटकेतील उमेश ऊर्फ साई, सोनू सिंग ऊर्फ सोन्या व दिनकर ऊर्फ पिन्या या तिघांविरुद्ध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. पिन्याविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात तब्बल १२ गुन्हे दाखल आहेत. त्यात विनयभंग, जबरी चोरी, लूटमार, हाणामारी अशा प्रकारच्या गुन्ह्यांचा समावेश आहे. सोन्याविरुद्ध सात गुन्हे दाखल आहेत, तर उमेशविरुद्ध तीन गुन्हे दाखल आहेत. या सर्वांविरुद्ध चोरी, हाणामारी, विनयभंग, आदी प्रकारचे गुन्हे दाखल आहेत.