जळगाव : दुधाच्या खरेदी दरात वाढ झाल्याने जिल्हा दूध संघातर्फे दुधाच्या किंमतीपाठोपाठ इतर दुग्धजन्य पदार्थांच्याही किंमती वाढविल्याने ताकाच्या दरात थेट आठ रुपये प्रती लिटरने तर तुपाचे दर ५० रुपये प्रती किलोने वाढले आहे. त्यात आता गुजरातच्या दूध संघांकडून स्पर्धा वाढत असल्याने भविष्यात हे दर आणखी वाढण्याची शक्यता आहे.जिल्हा दूध संघाच्यावतीने डिसेंबर २०१९पूर्वीच दुधाच्या खरेदी दरात वाढ करण्यात आली होती. त्या वेळी दुधाच्या विक्री दरामध्ये वाढ केली तरी इतर दुग्धजन्य पदार्थांचे दर ‘जैसे थे’ होते. मात्र दूध उत्पादकांना वाढीव खरेदी दर द्यावे लागत असल्याने उत्पादनाची तुलना पाहता दूध संघाचे उत्पन्न त्या प्रमाणात येत नसल्याने अखेर दूध संघाने इतरही दुग्धजन्य पदार्थांच्या किंमतीत वाढ केली आहे.यामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून २०रुपये लिटरवर असलेल्या ताकाचे दर थेट आठ रुपये लिटरने वधारुन ते २८ रुपये लिटर झाले आहे. अशाच प्रकारे मसाला ताकाचेही दर पाच रुपये प्रती पाऊचवरून आठ रुपये प्रती पाऊच झाले आहे. सर्वात जास्त वाढ म्हणजे तुपामध्ये झाली आहे. तुपाचे दर थेट ५० रुपये किलोने वधारले आहे.उन्हाळ््यामध्ये दुधाचे उत्पादन कमी होऊन आवक मोठ्या प्रमाणात घटते. त्यानुसार दरवर्षी खरेदी दर वाढवून द्यावे लागतात. यंदाही तीच स्थिती आहे. मात्र याचा बोझा आता थेट ग्राहकांच्या खिशावर येणार आहे.वाढती स्पर्धाउन्हाळ््यानंतर खरेदी दर कमी झाल्यास या दुग्धजन्य पदार्थांचे दर कमी होऊ शकतात, असे सांगितले जात आहे. मात्र दुसरीकडे गुजरातमधील खासगी व सहकारी दूध संघांनी दूध संकलन केंद्रे सुरू करण्याचा सपाटा लावल्याने जळगाव जिल्हा दूध संघासमोर स्पर्धा निर्माण झाली आहे. या स्पर्धेत दूध उत्पादकांना वाढीव खरेदी दर द्यावा लागत असल्याने व भविष्यातही द्यावा लागणार असल्याने दर कमी होण्याची शक्यता कमीच असून उलट किंमती वाढण्याची शक्यताही वर्तविली जात आहे.जिल्हा दूध संघाच्यावतीने डिसेंबर २०१९पूर्वीच दुधाच्या खरेदी दरात वाढ करण्यात आली होती. अनेक दिवस दुधाचे विक्री दर पूर्वीचेच कायम ठेवले होते. मात्र खरेदी दराच्या तुलनेत येणारे उत्पादन पाहता दूध संघाच्यावतीने २६ डिसेंबरपासून दूध दरवाढ लागू केली होती. त्यात सर्वच प्रकारच्या दुधाच्या विक्री दरात प्रती लिटर २ रूपयांनी वाढ करण्यात आली होती.दुधाच्या खरेदी दरात वाढ झाल्याने तूप, ताक यांच्या दरामध्ये वाढ करावी लागली. भविष्यात खरेदी दर कमी झाल्यास विक्री दर कमी होऊ शकतात.- के.बी. पाटील, प्रभारी व्यवस्थापकीय संचालक, जिल्हा दूध संघ
दुधाच्या वाढीव खरेदी दरामुळे दुग्धजन्य पदार्थांचेही दर वधारले, ताक थेट आठ रुपये लिटरने महागले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2020 12:10 PM