चाळीसगाव : गिरणा धरणात वेगाने पाण्याची आवक होत असून ९४ टक्के जलसाठा झाला आहे. धरण क्षेत्रासह परिसरात पाऊस पडत असल्याने पाण्याची आवक सुरु आहे. त्यामुळे धरणात येणारे वाढीव पुराचे पाणी नदीत सोडण्यासाठी येत्या २४ तासात धरणाचे काही दरवाजे उघडण्याची शक्यता आहे.गेल्यावर्षी देखील गिरणाने शतकी सलामी दिली होती. यावर्षी पर्जन्यमान चांगले होत असल्याने धरणाच्या वरील भागातील जलप्रकल्प ओव्हरफ्लो झाले आहेत. यामुळे सातत्याने गिरणा धरण्यात पाण्याची आवक होत आहे. धरण शंभर टक्के भरुन वाहण्याची शक्यता लक्षात घेऊन सावधानतेची सुचना जारी करण्यात आली आहे.शनिवारी धरणात ९४ टक्के जलसाठा झाला असून पाण्याची आवक थांबलेली नाही. त्यामुळे येत्या २४ तासात धरणाचे काही दरवाजे उघडून पाणी नदीत सोडण्यात येईल. यासाठी नदीकाठावरील गावांना सावधानतेचा इशारा देत सर्तक राहण्याच्या सुचना गिरणा पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता धर्मेंद्रकुमार बेहरे, उपविभागीय अभियंता हेमंत पाटील, शाखा अभियंता एस.आर.पाटील यांनी एका प्रसिद्धीपत्राव्दारे दिला आहे.
'गिरणा'ची शंभरीकडे आगेकूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2020 4:14 PM