लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : गिरणा धरणातून चार दिवसांपूर्वी सोडलेल्या आवर्तनामुळे जळगाव तालुक्यातील आव्हाणे येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वरील बायपास या कामासाठी तात्पुरत्या स्वरूपात बनवलेला कच्चा पूल वाहून गेल्यामुळे या कामावर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला आहे. रविवारी बायपासचे काम पूर्णपणे थांबले असून अजून आठवडाभर हे काम थांबण्याची शक्यता आहे.
गिरणा धरणातून पिण्याच्या पाण्यासाठी शुक्रवारी आवर्तन सोडण्यात आले आहे. रविवारी हे आवर्तन आव्हाणे येथे पोहोचले. बायपासच्या कामासाठी बनवण्यात आलेला तात्पुरता कच्चा पूल या पाण्यामुळे वाहून गेल्याची घटना शनिवारी रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास घडली आहे. यामुळे राष्ट्रीय महामार्गालगत तयार होणाऱ्या बायपासचे काम रविवारी पूर्णपणे ठप्प झाले होते. या कामाला गेल्या काही दिवसांपासून वेग आला आहे. मात्र शनिवारी रात्री गिरणा नदी पात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याची पातळी वाढल्यामुळे कच्चा पूल वाहून गेला आहे. यासह शेतकऱ्यांसाठी तयार करण्यात आलेला पूलदेखील वाहून गेला आहे. यामुळे नदीच्या पलीकडे असलेल्या शेतांमध्ये जायला शेतकऱ्यांनादेखील रस्ता उरलेला नव्हता.
नदीच्या पाण्यामुळे अनधिकृत वाळू उपसाही थांबला
शनिवारी गिरणा धरणातून सोडलेल्या आवर्तनामुळे नदीपात्रात पाण्याची पातळी वाढली आहे. यामुळे आव्हाने, निमखेडी, खेडी या भागात सुरू असलेला अनधिकृत वाळूचा उपसा तात्पुरता थांबला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून नदीपात्रात १०० ते २०० डंपरद्वारे अनधिकृत वाळूचा उपसा सुरू होता. मात्र गिरणा नदीला आलेल्या पुरामुळे हा उपसा काही अंशी थांबला आहे. दरम्यान, आवर्तनामुळे गिरणा काठावरचा गावांमधील पाणीटंचाईची समस्यादेखील काही अंशी मार्गी लागली आहे. यासह केळी उत्पादक शेतकऱ्यांनादेखील या आवर्तनामुळे फायदा होणार आहे.