जळगाव : गेल्या काही वर्षांत शासनाने ग्रामीण भागातील विद्यार्थांच्या शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी शाळांना डिजिटल रूप दिले आहे. शाळांमध्ये संगणक रूम, स्मार्ट टीव्ही, अत्याधुनिक ग्रंथालये आदी सुविधा तयार केल्या आहेत; मात्र शाळांतर्फे वीज बिल न भरण्यात आल्यामुळे महावितरणने जिल्ह्यातील १४९ शाळांचा वीज पुरवठा खंडित केला आहे. त्यामुळे लाखोंचे संगणक अन् स्मार्ट टीव्हीचा उपयोग काय?, असा प्रश्न विद्यार्थी व पालकांमधून उपस्थित केला जात आहे.
महावितरणतर्फे कोरोनाकाळात थकबाकी असलेल्या सर्व वर्गवारीतील ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करण्याची मोहीम राबविण्यात आली. यामध्ये शाळांवरदेखील कारवाई करण्यात आली. ज्या शाळांचे अनेक महिन्यांपासून वीज बिल थकीत आहे. अशा शाळांचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला. यामध्ये जळगाव जिल्ह्यातील १४९ शाळांचा समावेश आहे. यातील सर्वाधिक ३० शाळा यावल तालुक्यातील आहेत. या सर्व शाळांकडे महावितरणची लाखो रुपयांची थकबाकी आहे. यातील काही शाळांचे वीज बिल भरून वीज पुरवठा सुरळीतही सुरू करण्यात आला असल्याचे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातर्फे सांगण्यात आले.
वीज पुरवठा खंडित झालेल्या बहतांश शाळांचे वीज बिल भरण्यात आले आहे. या शाळांमध्ये वीज पुरवठाही सुरू झाला आहे. अद्याप ज्या शाळा बाकी आहेत, त्यांना लोकवर्गणीतून किंवा ग्रामपंचायतींच्या निधीतून वीज बिल भरण्याबाबत सूचित करण्यात आले आहे.
- विकास पाटील, शिक्षणाधिकारी, प्राथमिक विभाग