लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : गेल्या आठवड्यात शहरातील किमान तापमान ९ अंशांपर्यंत खाली आले होते. ३१ डिसेंबर रोजी रात्रीचा तापमानाने या हंगामातील नीचांक गाठला. मात्र, नववर्षाला सुरुवात झाल्यानंतर थंडीदेखील आता गायब झाली असून, आठवडाभरातच किमान तापमानात तब्बल १० अंशांची वाढ झाली असून, पारा आता १९ अंशांपर्यंत वाढला आहे. उन्हाळ्यातदेखील किमान पारा १९ ते २२ अंशांपर्यंत असतो. त्यामुळे ऐन हिवाळ्यात थंडीच गायब झाली आहे. त्याचा फटका रब्बी पिकांना बसत आहे.
गेल्या चार दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण असल्याने थंडी गायब झाली आहे. पावसामुळे कमाल तापमानात घट झाली असली तरी किमान तापमानात कोणतीही घट झालेली नाही. दरम्यान, ८ जानेवारीपर्यंत जिल्ह्यात ढगाळ वातावरण कायम राहणार असून, नऊनंतर जिल्ह्यात राजस्थानलगत तयार झालेला कमी दाबाचा पट्टा कमी होऊन पुन्हा जिल्ह्यात थंडीचे आगमन होण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तविली आहे.
ढगाळ वातावरणाचे काय आहे कारण
मध्य भारतवर सद्य:स्थितीत ‘कोन्फ़्लुएन्स झोन’ (विक्षोभ) तयार झाला आहे. यामुळे अरबी समुद्राकडून व बंगालच्या उपसागराकडून येणारे आर्द्रतायुक्त वारे वाहत येऊन मध्य भारताच्या भागात एकमेकांना ठोकले जात आहेत. यामुळे कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे येणाऱ्या काही दिवस जिल्ह्यात पावसाचाही अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तसेच या आर्द्र हवांमुळे उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांना अडकाव तयार होत आहे. त्यामुळे किमान तापमानात वाढ होत आहे. ढगाळ वातावरण कायम असून, अजून दोन दिवस हीच परिस्थिती कायम राहण्याची शक्यता आहे.
रब्बीच्या पिकांना कसा बसणार फटका
गेल्या चार दिवसांपासून किमान तापमानात वाढ होत असल्याने गहू, हरभरा , मका व दादर या पिकांना फटका बसण्याची शक्यता आहे. ढगाळ वातावरणामुळे हरभरा, मक्यावर अळीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. तसेच पाऊस झाल्यास हरभऱ्यावरील खार धुतला जाईल व यामुळे दाणे लागण्याचा प्रक्रियेवरदेखील परिणाम होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. तसेच थंडी गायब झाल्याने गव्हाच्या वाढीवरदेखील परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
असे वाढत गेले तापमान
तारीख-किमान तापमान-कमाल तापमान
३१ डिसेंबर - ९ अंश - ३० अंश
१ जानेवारी - १२ अंश - २९ अंश
२ जानेवारी - १३ अंश - - ३० अंश
३ जानेवारी - १७ अंश - ३० अंश
४ जानेवारी - १८ अंश - ३० अंश
५ जानेवारी - १९ अंश - ३०.९ अंश