जळगाव: जळगाव ते मनमाडच्या दरम्यान चौथ्या रेल्वे मार्गाचे काम सुरू असताना, रेल्वे मंत्रालयाने जळगाव ते मनमाड दरम्यान चौथ्या रेल्वे मार्गाच्या सर्वेक्षणालाही मंजुरी दिली आहे. रेल्वे मंत्रालयाच्या मंजुरीचे पत्र मध्य रेल्वेच्या मुंबईतील मुख्य कार्यालयाकडून नुकतेच भुसावळ विभागाला प्राप्त झाले आहे. रेल्वे मंत्रालयाच्या या मंजुरीनंतर भुसावळ रेल्वे प्रशासनातर्फे लवकरच निविदा प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.
मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागात गेल्या अनेक वर्षांपासून अप आणि डाऊन हे दोनच मुख्य रेल्वे मार्ग आहेत. दर दहा मिनिटाला या दोन्ही मार्गावरून एकामागून एक ट्रेन जात असल्यामुळे, हा मार्गावर सतत वर्दळ असते, तसेच या दोन्हीपैकी एका मार्गावर कधीतरी अपघाताची घटना घडल्यास, याचा रेल्वेच्या वाहतुकीवर मोठा परिणाम होतो. त्यामुळे मध्य रेल्वे प्रशासनातर्फे भुसावळ विभागात तिसऱ्या व चौथ्या रेल्वे मार्गाच्या उभारणीसाठी गेल्या अनेक वर्षांपासून रेल्वे मंत्रालयाकडे प्रस्ताव पाठविण्यात आले होते. यात सात वर्षांपूर्वी भुसावळ ते जळगाव दरम्यान तिसऱ्या व चौथ्या रेल्वे मार्गाच्या कामाला मंजुरी देण्यात आली होती, तर चार वर्षांपूर्वी जळगाव ते मनमाड दरम्यान तिसऱ्या रेल्वे मार्गाच्या कामाला मंजुरी मिळाली होती. आता रेल्वे मंत्रालयाने पुन्हा जळगाव ते मनमाड दरम्यान चौथ्या रेल्वे मार्गाच्या सर्वेक्षणाला मंजुरी देऊन, ऐन दिवाळीत भुसावळ रेल्वे प्रशासनाला व प्रवाशनांही भविष्यातील सुविधेच्या दृष्टिकोनातून दिवाळीचे गिफ्ट दिले आहे. दरम्यान, रेल्वे मंत्रालयाने भुसावळ ते खंडवाच्या दरम्यानही तिसऱ्या व चौथ्या रेल्वे मार्गाच्या सर्वेक्षणाला मंजुरी दिली असून, यासाठी दोन कोटींचा निधी मंजूर केला आहे.
सर्वेक्षणासाठी लवकरच निविदा प्रक्रिया भुसावळ रेल्वे प्रशासनातर्फे या चौथ्या रेल्वे मार्गाच्या सर्वेक्षणासाठी लवकरच निविदा प्रक्रिया राबविली जाणार आहे. जळगाव ते मनमाड हा १६० किलोमीटरचा मार्ग असून, रेल्वेची मान्यता असलेल्या एजन्सीतर्फे हे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. या सर्वेक्षणात भूसंपादन किती करायचे, कुठे ब्रीज बांधायचे, कुठे बोगदे बांधायचे, किती खर्च येणार आदी तांत्रिक बाबींचे सर्वेक्षण यावेळी करण्यात येणार आहे. या सर्वेक्षणासाठी रेल्वे मंत्रालयाने दीड कोटीचा निधी मंजूर केला असून, सर्वेक्षणानंतर तो अहवाल मंजुरीसाठी रेल्वे मंत्रालयाकडे पाठविण्यात येणार आहे.
नवीन मार्गाचे हे होणारे फायदे- जळगाव ते मनमाड दरम्यान होणाऱ्या तिसऱ्या व चौथ्या रेल्वे मार्गामुळे गाड्या विलंबाने धावण्याचे प्रमाण कमी होईल.- मेगाब्लॉकमुळे गाड्या रद्दचे प्रमाण कमी होईल.- अप किंवा डाऊनच्या मुख्य लाईनला कधी अपघात झाला, तर वाहतूक विस्कळीत होण्याचे प्रमाण कमी होईल.- सण-उत्सवात नवीन गाड्यांची संख्या वाढविता येईल.- या नवीन मार्गांमुळे भुसावळ ते मनमाड दरम्यान स्वतंत्र लोकलची सेवाही सुरू करता येईल.
रेल्वे मंत्रालयाने जळगाव ते मनमाडच्या दरम्यान चौथ्या, तर भुसावळ ते खंडवाच्या दरम्यान तिसऱ्या व चौथ्या रेल्वे मार्गाच्या सर्वेक्षणालाही मंजुरी दिली आहे. सर्वेक्षणासाठी लवकरच भुसावळ रेल्वे प्रशासनातर्फे लवकरच निविदा प्रक्रिया काढण्यात येणार आहे. रेल्वे मंत्रालयाने मुंबई मार्गावर व खंडवा मार्गावरही नवीन रेल्वे मार्गांच्या सर्वेक्षणाला मंजुरी दिल्याने, भुसावळ विभागातील प्रवाशांसाठी ही मोठी आनंदाची बाब आहे. अशी माहिती डॉ.शिवराज मानसपुरे यांनी दिली.