चाळीसगाव - बहाळ येथे रितेश रामदास झोडगे (वय१७) आणि सोनल कुंदन ढोले (वय १५) या अल्पवयीन तरुण - तरुणीने एकाच दोरीने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांनी प्रेमप्रकरणातून आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. एका झाडाला एकत्रित गळफास घेतल्याच्या स्थितीत त्यांचे मृतदेह २७ रोजी पहाटे पावणेदोन वाजता रितेशच्या गुढे - बहाळ रस्त्यालगतच्या शेतात आढळले. उभय तरुण - तरुणी शुक्रवारी रात्रीच घराच्या बाहेर पडले. रितेश हा चौशास जातो असे सांगून गायब झाला. सोनल ही बहाळ येथेच १० वी शिकत होती. प्रजासत्ताक दिनाच्या लेझिम पथकात तिने सहभाग घेतला होता. रितेश हा कोळगाव येथे १२ वीत शिकत होता. दोघांच्या कुटूंबातील परिस्थिती साधारण असून शनिवारी पहाटेपासून या घटनेमुळे बहाळ परिसरात खळबळ उडाली. मेहुणबारे पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आहे. चाळीसगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दोघांचे शवविच्छेदन करण्यात आले. रामदास झोडगे यांच्या फिर्यादीवरुन मेहुणबारे पोलिस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास एएसआय पृथ्वीराज कुमावत करीत आहे.
जळगावात अल्पवयीन तरुण - तरुणीची आत्महत्या, गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2018 12:00 PM