ऑनलाईन लोकमत
भुसावळ,दि.19 - आझाद हिंद एक्स्प्रेसमधून जळगाव येथे उतरवून घेण्यात आलेल्या दोन अल्पवयीन मुलींसह तरुणीला येथील आरपीएफ विभागाने सिक्कीम पोलिसांच्या स्वाधीन केल्याची माहिती आरपीएफचे निरीक्षक व्ही.के.लांजिवार यांनी दिली.
15 जुलै रोजी 12130 हावडा-पुणे आझाद हिंद एक्स्प्रेसने दोन अल्पवयीन मुलींसह तरुणी पुणे येथे जात असल्याची माहिती आरपीएफ नियंत्रण कक्षाला मिळाल्यानुसार आरपीएफचे एस.एस.चहार व त्यांचे दोन सहकारी भुसावळ स्थानकावर पोहचले. आरपीएफने जळगाव येथे संदेश देऊन जळगाव येथील आरपीएफ पथकाने या मुलींना तरुणीसह गाडीत उतरवून भुसावळ येथे आणले.
आरपीएफच्या जयश्री पाटील यांनी त्यांची विचारपूस केली असता त्यांनी सर्व प्रकार कथन केला. या नंतर जयश्री पाटील यांनी त्यांच्या नातेवाईकांशी संपर्क साधून बोलणे करुन दिले.
आज पहाटे मुंबई मेलने दोन महिला पोलीस व एक फौजदार असे पथक आज येथे दाखल झाले. मुलीचा भाऊदेखील सोबत होता. आरपीएफने कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करुन मुलींना त्यांच्या स्वाधीन केले. सिक्कीम पोलिसांच्या पथकात चंद्रकुमार सुब्बा, सुकून पवडेल, उमा बुङोल व मुलीचा भाऊ मनीकुमार सुनार होते.
मुलीच्या भावाने मानले पोलिसांचे आभार
आमच्या बहिणी ज्यावेळेस मिसिंग झाल्या तेव्हापासून आम्ही खूप दु:खी होतो. आमच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला होता. वेळोवेळी आम्ही त्यांची वाट पाहत होतो. पण भुसावळ आरपीएफच्या पथकाच्या कामगिरीमुळे आज माझा चेहरा आनंदाने फुलला आहे. त्यांच्यामुळेच माङया बहिणी आम्हाला मिळाल्या. त्यांच्या कामगिरीचे कौतुक करावेसे वाटते, असे मणीकुमार सुनार यांनी ‘लोकमत’जवळ मत व्यक्त केले.