भुसावळ : यावल येथील धनगर वाड्यात १६ सप्टेंबर २०१७ रोजी आरोपी खटाबाई माधव धनगर, अभिमान धनगर, सागर धनगर व संजय धनगर आदींनी प्रदीप सुकलाल धनगर यास लाकडी दांडग्याने डोक्यावर व शरीरावर लाथाबुक्क्यांनी संगनमताने बेकायदेशीर जमाव जमवून बेदम मारहाण केल्याप्रकरणी त्यांना यावल न्यायालयाने वेगवेगळ्या कलमांनुसार दोषी ठरवून तीन वर्षे सक्तमजुरीची व २३ हजार रुपये दंड अशी शिक्षा २२ रोजी सुनावली. न्यायमूर्ती डी.जी.जगताप यांनी हा निकाल दिला. यावल न्यायालयाने सातत्याने दुसऱ्या दिवशी आरोपींना शिक्षा दिल्यामुळे गुन्हेगारांमध्ये खळबळ उडाली आहे.सर्व आरोपींनी किरकोळ कारणावरून फिर्यादी प्रदीप यास बेदम मारहाण केल्याने तो गंभीर जखमी झाला होता. यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर न्यायालयात दोषारोप पत्र दाखल करण्यात आले होते.याप्रकरणी सरकारी वकील अॅड.नितीन खरे यांनी सरकारतर्फे एकूण आठ साक्षीदार तपासले. फिर्यादी, साक्षीदार, पंच, वैद्यकीय अधिकारी तसेच तपासी अंमलदार यांच्या साक्षी महत्वपूर्ण ठरल्या.तपास महिला पोलीस उपनिरीक्षक सुनीता कोळपकर यांनी केला होता. सरकारी वकील अॅड.नितीन खरे यांचा युक्तीवाद प्रभावी ठरला.न्यायालयाने आरोपी सागर संजय धनगर यास भादंवि कलम ३२६ अन्वये तीन वर्षे सक्तमजुरी व १० हजार रुपये दंड तसेच भादंवि कलम १४३ सह १४९ अन्वये दोन वर्षे सक्तमजुरी व एक हजार रुपये दंड अशी शिक्षा, तसेच भादंवि कलम १४८ सह १४९ अन्वये दोन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली.त्याचप्रमाणे आरोपी खटाबाई हिस भादंवि कलम १४३ सह १४९ अन्वये दोन हजार रुपये दंडाची शिक्षा व भादंवि कलम १४८ सह १४९ अन्वये दोन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.तसेच आरोपी अभिमान धनगर व संजय धनगर यांना भादंवि कलम १४३ सह १४९ अन्वये प्रत्येकी सहा महिने सक्तमजुरीची व प्रत्येकी एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.तसेच आरोपी अभिमान व संजय धनगर यांना भादवि कलम १४८ सह १४९ अन्वये प्रत्येकी दोन वर्षे सक्तमजुरीची व प्रत्येकी दोन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली.एकूण २३ हजार रुपये दंडाच्या रक्कमेतून १५ हजार रुपये फिर्यादी प्रदीप धनगर यास अपील कालावधीनंतर देण्याचा आदेश न्यायालयाने दिला.सरकारी वकील नितीन खरे यांना याकामी पैरवी अधिकारी ऊल्हास राणे व केस वॉच अलीम शेख यांनी मदत केली. आरोपींतर्फे अॅड.जगदीश कापडे यांनी काम पाहिले.
किरकोळ कारणावरून मारहाणप्रकरणी एकास तीन वर्ष सक्तमजुरी व २३ हजार रुपये दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2020 11:36 PM
किरकोळ कारणावरून मारहाणप्रकरणी एकास तीन वर्ष सक्तमजुरी व २३ हजार रुपये दंड अशी शिक्षा २२ रोजी सुनावली.
ठळक मुद्देयावल न्यायालयाचा निकालगुन्हेगारांमध्ये खळबळ