अमित महाबळ
जळगाव : दहावी आणि बारावीच्या परीक्षा सुरू असतानाच विद्यार्थ्यांनी सरकारच्या कॉपीमुक्त परीक्षा अभियानाची ऐशीतैशी करून टाकली आहे. मायमराठीच्या पेपरला काही परीक्षा केंद्रांवर कॉपी पुरविणाऱ्यांचा सुळसुळाट होता; पण कॉलेजमध्ये गेल्यावर हीच मुले-मुली सुतासारखी सरळ होतात. कॉपी करण्याची हिंमत करत नाहीत. मग नेमके चुकतेय कोणाचे? असा प्रश्न यामुळे उपस्थित झाला आहे.
कॉपी रोखण्यासाठी केलेल्या नियमांची कठोर अंमलबजावणी, कडक कारवाई झाली तरच परीक्षेतील गैरप्रकार थांबू शकतात. संस्थाचालक, केंद्रचालक, शिक्षक, शासकीय यंत्रणा या सगळ्यांची भूमिका यामध्ये महत्त्वाची आहे. जे विद्यापीठ, महाविद्यालय स्तरावर जमते ते शाळांमध्येही शक्य असल्याचे शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांचे म्हणणे आहे.
अवाजवी महत्त्व वाढवल्याचे परिणाम
दहावी, बारावीच्या परीक्षांचे महत्त्व अवाजवी वाढवले आहे. भरपूर गुण मिळविण्याचा विद्यार्थ्यांवर दबाव असतो, शाळांनाही आपला चांगला निकाल हवा असतो. कॉपी रोखण्यात संस्थाचालक, शिक्षक, शिक्षण विभाग यांची भूमिका महत्त्वाची आहे. कॉपी करून पास होणे म्हणजे पायावर धोंडा मारून घेणे. पालक व शिक्षकांनी हे विद्यार्थ्यांना समजावून सांगावे. महाविद्यालयीन स्तरावर कॉपी कमी आहे. कबचौउमविचे प्रथम कुलगुरु डॉ. एन. के. ठाकरे यांनी कॉपीविरोधात कडक भूमिका घेतली होती. विद्यापीठाचा परीक्षा विभाग परीक्षेतील गैरप्रकारांच्या संदर्भात अतिशय कठोर आहे. कॉपी प्रकरणांना थारा देत नाही. त्यावर कारवाई केली जाते.
- डॉ. के. बी. पाटील, माजी कुलगुरू, कबचौउमवि
त्यांनी तर विरोध पत्करला
दहावी, बारावीच्या परीक्षेत कोणत्याही यंत्रणेने कॉपीला वाव देऊ नये. विद्यापीठ व महाविद्यालयीन स्तरावर कॉपी होण्याचे प्रमाण अतिशय कमी आहे. विद्यापीठाचे प्रथम कुलगुरू डॉ. एन. के. ठाकरे यांनी कॉपीमुक्त परीक्षांसाठी काही संस्थाचालक व गुंड प्रवृत्तीच्या लोकांचाही विरोध पत्करला होता. विद्यापीठाचे कॉपी केसचे नियम कडक आहेत, विद्यार्थ्यांना डिबार केले जाते. महाविद्यालयात आल्यावर विद्यार्थी मॅच्युअर्ड होतात. मेहनतीने पदवी घ्यावी लागेल हे त्यांना कळलेले असते. दहावी, बारावीचे विद्यार्थी वयानुसार अल्लड असतात. या सर्वांमध्ये पालकांची भूमिका महत्त्वाची आहे.
- प्रा. दीपक दलाल, प्रभारी संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ, विद्यापीठ
विद्यार्थी, महाविद्यालय दोघांवर कारवाई होते
महाविद्यालयात कॉपीला थारा नसतो. कडक तपासणी असते. वर्गात लेखन साहित्याशिवाय इतर काहीच आणू देत नाही. कुणी आढळून आला तर त्याला चौकशीसाठी बोलावले जाते. दोषी आढळला तर त्याच्यावर व महाविद्यालयावरदेखील कारवाई होते. बारावीनंतर विद्यार्थ्यांमध्ये प्रगल्भता आलेली असते, करिअरचा दबाव असतो. त्यामुळे ही मुले शक्यतो गैरमार्गाला जाण्याचे धजावत नाहीत. दहावी, बारावीला कॉपी रोखण्याच्या कठोर तरतुदी आहेत. त्यानुसार कारवाई झाली पाहिजे.
- डॉ. एल. पी. देशमुख, प्राचार्य, नूतन मराठा
आता तर मराठी झाला, इंग्रजी अन् गणित बाकी
कॉपी रोखण्यासाठी परीक्षा केंद्रचालक, शिक्षक यांची मानसिकता बदलायला हवी. पालकांचे प्रबोधन झाले पाहिजे. विद्यार्थी नववीपर्यंतच्या परीक्षा देतातच. त्यानंतर एकदम दहावीच्या परीक्षेचा ‘बाऊ’ केला जातो. यातून मग या परीक्षेत गैरप्रकार घडतात. आता तर मराठीचा पेपर झाला आहे. अजून इंग्रजी व गणित बाकी आहेत. शासकीय यंत्रणांनी कॉपीवर नियंत्रण ठेवले पाहिजे.
- चंद्रकांत भंडारी, शिक्षण तज्ज्ञ