जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या फार्मसीच्या विद्यार्थ्यांचा बुधवारी विद्यापीठाच्या संकेतस्थळावर निकाल जाहीर करण्यात आला आहे. मात्र, प्रत्यक्षात गुणपत्रिकेवर निकालाची तारीख १० एप्रिल दर्शविण्यात आली आहे. या तारखांच्या घोळामुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे.
कोरोनाचा काळ असल्यामुळे सर्वच ऑनलाईन असताना विद्यापीठाची अधिकृत माहिती देणारी वेबसाइट योग्यरित्या अपडेट ठेवणे गरजेचे आहे. परंतु, विद्यापीठामध्ये सध्या प्रभारीराज सुरू आहे. दरम्यान, बुधवार ७ एप्रिल रोजी विद्यापीठाच्या फार्मसीच्या विद्यार्थ्यांचा विद्यापीठाच्या संकेतस्थळावर निकाल जाहीर करण्यात आला आहे. त्यावर जाहीर झालेले निकाल पाहिले असता, त्यात गुणपत्रिकेवर निकालाची तारीख ही १० एप्रिल दर्शविण्यात आली आहे. जी तारीख अजून येणे बाकी, त्याआधीच निकाल जाहीर केल्यामुळे तारखांचा घोळ समोर आला आहे. हा प्रकार एनएसयुआयचे जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांनी समोर आणला असून याबाबत त्यांनी विद्यापीठाला माहिती देवून चांगले धारेवर धरले होते.