पहूर, ता. जामनेर - वाकडी, ता. जामनेर येथील येथील बेपत्ता ग्रा.पं.सदस्य विनोद लक्ष्मण चांदणे यांच्या शोधादरम्यान रविवारी पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर जवळील पिंप्री धरणात मानवी शरीराचे अवशेष आडळून आले. हे अवशेष नेमके कोणाचे आहे, याच्या तपासासाठी त्यांची डीएनए चाचणी करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान, विनोद चांदणे यांचा घातपात केल्याचा संशय त्यांच्या भावांनी व्यक्त केला आहे .विनोद चांदणे हे १९ मार्चपासून बेपत्ता असून या प्रकरणी शनिवारी चार जणांविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तीन जणांना अटक करण्यात आले आहे. या प्रकरणाच्या तपासादरम्यान रविवारी पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पिंप्री धरणाजवळ पोहचले. दुपारी चार वाजता या ठिकाणी मानवी शरीराचे अवशेष आढळून आले. हे अवशेष डीएनए चाचणीसाठी पाठविण्यात आले असून या वैद्यकीय चाचणीच्या अहवालानंतर मृतदेहाची ओळख निष्पन्न होणार असल्याचे पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले यांनी सांगितले.रविवारी सकाळी अकरा वाजता पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले यांचा ताफा पहूर पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाला. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव, डीवायएसपी केशवराव पातोंड, एलसीबीचे पोलीस निरीक्षक बापू रोहम, पिंपळगाव हरेश्वरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील, पहूरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप शिरसाट यांच्या सोबत घटनेच्या तपासाचा आढावा घेण्यात आला. त्यानंतर हा ताफा विनोदचे अपहरण झालेल्या वाकडी धरणाच्या भिंतीजवळ घटनास्थळी पोहचला व माहिती जाणून घेतली. तेथून ते पहूर पोलीस ठाण्यात परतले. या ठिकाणी पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर, पिंप्री येथील स्थानिक पोलीस पाटलाकडून घटनेच्या संदर्भात काही माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले यांच्यासह सर्व ताफा पिंप्री धरणावर पोहचला. तेथे शोध मोहिमे दरम्यान राखेने भरलेल्या दोन गोण्या पाण्यात आढळून आल्या. तपासणी दरम्यान फॉरेन्सिक लॅबच्या पथकाने राखेतून मृतदेहाचे अवशेषांचे वेगवेगळे नमुने घेतले. हे नमुने डीएनए चाचणीसाठी नाशिक येथे पाठविण्यात येणार असून विनोदच्या भावांची ही डीएनए चाचणी घेण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.या संदर्भात डॉ. पंजाबराव उगले यांनी सांगितले की, घटनेचा तपास सुरू असून मिळालेली अवशेषांची ओळख डीएनए चाचणीच्या वैद्यकीय अहवालानंतर निष्पन्न होईल. या क्षणाला या घटनेने बाबत काही सांगता येणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.अपहरण प्रकरणी अटक असलेले महेंद्र राजपूत, विनोद देशमुख व नामदार तडवी यांना शनिवारी पोलिसांनी अटक केली होती. रविवारी जिल्हा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.पोलीस अधीक्षकांनी पीडित कुटुंबाची भेट नाकारल्याचा आरोपवाकडीत घटनास्थळी पोलीस अधीक्षक डॉ. उगले आले मात्र त्यांनी पीडित कुटुंबाची भेट घेण्याची तसदी घेतली नाही, असा आरोप विनोदचे भाऊ राजेंद्र चांदणे यांनी केला.वाकडीतील महिलांची पोलीस ठाण्यात धडककाही दिवसांपूर्वी अल्पवयीन मुलींचे अपहरण झाले होते. या पीडीत मुलींचे नातेवाईक रविवारी पहूर पोलीस स्टेशनमध्ये येऊन या प्रकरणात माजी सरंपचाचा हात असल्याचा आरोप केला. त्याला तात्काळ अटक करा अशी मागणी केली.
वाकडीच्या बेपत्ता ग्रा.पं. सदस्याच्या शोधादरम्यान सापडले मानवी अवशेष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2019 8:45 PM