जामनेर- काँग्रेस मधून निलंबित झालेले सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांनी रविवारी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांची निवासस्थानी भेट घेतली. मुलीच्या लग्नाचे निमंत्रण देण्यासाठी आलेल्या सत्तार यांनी महाजन यांचेशी ४० मिनिटे बंदद्वार चर्चा केली. विखे पाटील यांच्यासोबत भाजपच्या वाटेवर असलेल्या आमदारांमध्ये सत्तार यांच्या नावाची चर्चा असल्याने या भेटीबाबत राजकारणात चर्चेला उधाण आले आहे.सकाळी ११ वाजता सत्तार महाजन यांच्या निवासस्थानी आले. काही वेळ त्यांनी कार्यकर्त्यांसमोर महाजन यांचेशी चर्चा केली. नंतर महाजन त्यांना घेऊन मागील दाराने दुसरी खोलीत गेले. याठिकाणी त्यांनी तब्बल ४० मिनिटे चर्चा केली.बाहेर आल्यावर महाजन यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले की, सत्तार माझे चांगले मित्र आहे. मुलीच्या लग्नाचे निमंत्रण देण्यासाठी ते आले होते. सत्तार यांच्या भाजप प्रवेशाबाबत विचारले असता महाजन यांनी सांगितले की, त्यांनी काँग्रेस सोडली आहे. योग्य पक्षाच्या शोधात ते आहेत.ईश्वरलाल जैन यांच्याशी मोबाईलवर संवाददरम्यान, राष्ट्रवादीचे नेते माजी खासदार ईश्वरलाल जैन यांचे समर्थक शीतल साळी हे यावेळी महाजन यांचे निवासस्थानी आले होते. त्यांनी सत्तार यांचेशी चर्चा केली. नंतर साळी यांनी सत्तार यांचे जैन यांचेशी मोबाईलवर बोलणे करून दिले.काँग्रेसचे विखे पाटील यांचे सोबत भाजपमध्ये ५ आमदार भाजप मध्ये प्रवेश करणार असल्याची राजकीय क्षेत्रात जोरदार चर्चा असल्याने महाजन व सत्तार यांच्या भेटीला महत्व प्राप्त झाले आहे.मुलीच्या विवाहाचे निमंत्रण देण्यासाठी महाजन यांचेकडे आलो होतो. भाजप प्रवेशाबाबत कोणतीही चर्चा झाली नाही. विखे पाटील यांचे आमचे नेते आहेत. तेच याबाबत निर्णय घेतील.- आमदार अब्दुल सत्तार.
आमदार अब्दुल सत्तार गिरीश महाजनांच्या निवासस्थानी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 02, 2019 4:36 PM