जळगाव : जिल्ह्यात मार्च २०१९ अखेर ११ कोटी ९८ लाखांच्या निधीचा ‘स्पिल’ (निधी अभावी अपूर्ण कामे) असल्याचे आढळून आले होते. त्यातील ७.६५ कोटींचा निधी शासनाकडे परत गेला होता. तो निधीही शासनाने परत दिला असल्याने मार्च अखेरीस खर्च करणे आवश्यक आहे. मात्र त्यासाठी संबंधीत विभागांकडून अद्यापही प्रस्तावच आलेले नसल्याने याबाबत नियोजन अधिकाऱ्यांनी आढावा घेऊन संबंधीत अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.मार्च २०१९ अखेरीस आमदार निधीचा ११.९८ कोटींचा स्पिल होता. तर वितरीत झालेल्या निधीपैकी राज्य शासनाच्या विभागांकडील ७.६५ कोटींचा निधी अखर्चित राहिल्याने शासनास परत गेला होता. शासनाने हा निधी या नवीन आर्थिक वर्षात परत दिला.मात्र आता हा निधी मार्च २०१९ अखेर खर्च होणे अपेक्षित आहे. मात्र सर्वच यंत्रणांकडून धीम्यागतीने कार्यवाही सुरू असल्याचे चित्र आहे. या निधीसाठी डिसेंबर उजाडला तरीही संबंधीत विभागांकडून प्रस्ताव पाठविण्याची कार्यवाही देखील झालेली नाही. याबाबत जिल्हा नियोजन अधिकारी प्रताप पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सर्व संबंधीत विभागाच्या अधिकाºयांची बैठक नुकतीच पार पडली. त्यात हा निधी तातडीने खर्ची टाकण्याबाबत सूचना करण्यात आल्या. तर अद्यापही ४.९२ कोटींचा निधी अविरित आहे.संबंधीत कार्यालयांकडून निधीची मागणीच होत नसल्याने हा निधी वितरीत होऊ शकलेला नाही. आधी लोकसभा निवडणूक व त्यानंतर विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता आडवी आल्याने निधी खर्च करण्यात अडचणी आल्या आहेत.काय आहे ‘स्पिल’?दरवर्षी प्रत्येक आमदाराला २ कोटींचा निधी मिळतो. नियोजन समिती दरवर्षी त्याच्या दीडपट कामांना मंजुरी देत असते. त्या आर्थिक वर्षात जी कामे पूर्ण होतील, त्यांना निधी दिला जातो. उर्वरीत कामांना पुढच्या वर्षी निधी दिला जातो. ही निधी अभावी जी कामे अपूर्ण असतात त्याला ‘स्पिल’ म्हटले जाते.
आमदार निधी कामांचे प्रस्ताव मिळेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 09, 2019 7:36 PM