जळगाव : लोणी, बटर व तुपावरुन दूध संघाचे वातावरण चांगलेच तापले असून लोणी व बटरच्या विक्रीत एक कोटी १५ लाख रुपयांचा अपहार झाल्याचा आरोप करुन संबंधितांविरुध्द गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी आमदार एकनाथ खडसे यांनी गुरुवारी दुपारी जळगाव शहर पोलीस ठाण्यात निरीक्षकांच्या दालनात ठिय्या मांडला. जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत येथून हलणार नसल्याचा पवित्रा घेतल्याने पोलीस यंत्रणेची धावपळ उडाली आहे. दुपारी चार वाजेपासून खडसे यांनी ठिय्या मांडलेला आहे. अजूनही ते पोलीस ठाण्यातच आहेत.
ठाकरे सरकार स्थापन झाल्यावर सरकाने दूध संघाचे संचालक मंडळ बरखास्त केले होते. आमदार मंगेश चव्हाण यांची प्रशासक म्हणून नियुक्ती झाल्यानंतर ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात प्रभारी कार्यकारी संचालक शैलेश सुरेश मोरखडे म्हणून यांची निवड झाली होती. बी ग्रेड तुपाची परस्पर विक्री करुन २ लाख ७ हजाराचे नुकसान केल्याची तक्रार मोरखडे यांनी दिली होती. त्यानुसार गुन्हा दाखल झाला होता. सरकारचा निर्णय उच्च न्यायालयाने रद्द ठरविल्याने पुन्हा पुर्वीचे संचालक मंडळ अस्तित्वात आले. दूध संघाच्या चेअरमन मंदाकिनी खडसे व कार्यकारी संचालक मनोज लिमये यांनी बुधवारी शहर पोलीस ठाणे गाठून लोणी व दूध पावडरची परस्पर विक्री करुन एक कोटी १५ लाख रुपयांचा अपहार केल्याची तक्रार करुन गुन्हा दाखल करण्याची मागणी केली, मात्र गुन्हा दाखल झाला नाही. त्यामुळे गुरुवारी खडसे यांनी शहर पोलीस ठाण्याच्या निरीक्षकांच्या दालनातच ठिय्या मांडला.
खडसेंनी मांडला पोलीस ठाण्यात ठिय्याबी ग्रेड तूपाचे व आताचे बटर, दूध पावडरचे प्रकरण पुर्णत: वेगळे आहे. याचा स्वतंत्र गुन्हा दाखल करावा म्हणून दोन दिवसापासून पोलिसांकडे पाठपुरावा करीत आहे. पोलीस आरोपींना मदत करीत आहेत. गुन्हा दाखल झाला नाही म्हणून संशयित तीन जण फरार झालेले आहेत. गुन्हा दाखल करुन तपासात सत्य उघड होईलच. ज्यांनी आधी तक्रार केली, त्यांच्याच लोकांनी हा गैरव्यवहार केला आहे. असे आमदार एकनाथ खडसे यांनी म्हटले.
एकनाथ खडसे यांनी केलेल्या तक्रारीची चौकशी केली जाईल. आर्थिक गुन्ह्यांमध्ये आधी तपास केला जातो. सर्वोच्च न्यायालयाने देखील एका प्रकरणात असा निर्णय दिलेला आहे. खडसे यांना लेखी पत्र देण्यात येईल. चौकशीत जे काही निष्पन्न होईल, त्यानुसार कारवाई केली जाईल. अशी माहिती पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांनी दिली.