जळगाव : रावेर विधानसभा मतदार संघाचे आमदार हरिभाऊ जावळे यांची महाराष्ट्र कृषी व संशोधन परिषदेच्या उपाध्यक्ष पदावर नियुक्ती करण्यात आली असून आमदार जावळे यांना कॅबिनेट मंत्रिपदाचा बहुमान मिळाला आहे. या निवडीमुळे जळगाव जिल्ह्यालाही चौथ्या मंत्रीपदाच्या दर्जाचा मान मिळाला आहे.महाराष्ट्र कृषि विद्यापीठ अधिनियम १९८३ मधील कलम १२(२)(ब) मधील तरतुदीनुसार महाराष्ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषदेच्या उपाध्यक्ष पदावर रावेर-यावलचे आमदार जावळे यांच्या नियुक्तीचे आदेश राज्य सरकारने २५ रोजी काढले. या पदाला कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा आहे. या संदर्भात महाराष्ट्र शासनाने काढलेल्या आदेशात म्हटले आहे की, हरिभाऊ जावळे यांची ही नियुक्ती सदर नियुक्तीच्या दिनांकापासून ३ वषार्साठी किंवा राज्यशासनाची मर्जी असेल तोपर्यत असेल. या आदेशाची प्रत उपसचिव महाराष्ट्र शासन सु.सं.धपाटे यांच्या स्वाक्षरीने काढण्यात आलेली आहे.जिल्ह्याला चौथ्या मंत्रीपद दर्जाचा मानआमदार हरिभाऊ जावळे यांच्या या निवडीमुळे जळगाव जिल्ह्याला चौथ्या मंत्रीपद दर्जाचा मान मिळाला आहे. जिल्ह्यातील गिरीश महाजन यांच्याकडे जलसंपदा, वैद्यकीय शिक्षण व इतर खात्यांच्या मंत्रीपदासह जिल्ह्याचे पालकमंत्रीपद, गुलाबराव पाटील यांच्याकडे सहकार राज्यमंत्रीपद तसेच माजी आमदार गुरुमुख जगवानी यांच्याकडे मंत्रीपदाच्या दर्जाचे सिंधी अकादमीचे अध्यक्षपद आहे. आता आमदार हरिभाऊ जावळे यांना महाराष्ट्र कृषी व संशोधन परिषदेच्या उपाध्यक्ष पद मिळाल्याने जिल्ह्याला चौथ्या मंत्रीपद दर्जाचा मान मिळाला आहे.
आमदार हरिभाऊ जावळे यांना कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2019 11:53 AM