जळगाव- बीएचआर पतसंस्था अपहार प्रकरणाशी कोणताही संबंध नसताना त्यात आपल्याला गोवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप आमदार मंगेश चव्हाण यांनी शनिवारी जळगावात केला. बीएचआर या गोंडस नावाखाली राजकीय सुपारी घेऊन तसेच सरकारी यंत्रणेला हाताशी धरत बहुजन लोकप्रतिनिधींना संपविण्याचा हा प्रयत्न असल्याचेही आमदार चव्हाण या वेळी म्हणाले.
बीएचआर पतसंस्था अपहार प्रकरणाच्या सुनावणीवेळी आमदार मंगेश चव्हाण यांच्याशी झालेल्या व्यवहाराचा उल्लेख आल्याचे समोर आल्यानंतर या विषयी आमदार मंगेश चव्हाण यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेतली. या वेळी त्यांनी वरील दावा करीत संबंधितांवर आपण अब्रुनुकसानाचा दावा दाखल करणार असल्याचेही सांगितले.
कोणतीही ‘सेटलमेंट’ न करता पूर्ण कर्ज भरलेजिल्ह्यातील विजेचा प्रश्न असो की अवैध धंदे असो यांच्याविषयी आवाज उठविल्याने आक्रमकता वाढत असल्याचे पाहून मला संपविण्याचा डाव सुरू असल्याचा दावा या वेळी आमदार चव्हाण यांनी केला. ११ ऑगस्ट रोजी बीएचआर प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान माझ्या नावाचा उल्लेख आलेला नसताना तशा बातम्या छापून आल्या. प्रत्यक्षात बीएचआर, सुनील झवर यांच्याशी माझा कोणताही संबंध नसताना विनाकारण नाव गोवण्यात येत असल्याचे ते म्हणाले. २०१२मध्ये मी बीएचआर पतसंस्थेतून कर्ज घेतले व ते २०१४मध्येच कोणतीही तडजोड न करता पूर्ण कर्ज भरल्याचे त्यांनी सांगितले.
चौकशीला घाबरुन पळणारा आमदार नाहीतपास यंत्रणेने माझ्याशी संबंधित काही गैरव्यवहार झाले असल्यास तशी चौकशी करावी व काही आढळल्यास कारवाई करावी, असे आव्हानही त्यांनी दिले. चौकशी होणार म्हणून घाबरुन पळून जाणारा व लांब राहणारा आमदार मी नाही, असाही टोला त्यांनी कोणाचेही नाव न घेता लगावला. या प्रकरणाची माहिती मी मागविली असून ती पूर्ण मिळालेली नाही. ती मिळाल्यानंतर विधीमंडळात सादर करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
जळगावातच कारवाई का?बीएचआर पतसंस्था ही मल्टीस्टेट संस्था असल्याने तिचे कार्यक्षेत्र देशभर आहे. असे असताना जळगाव जिल्ह्यातीलच मंडळींवर कारवाई का केली जात आहे, इतर ठिकाणी का कारवाई होत नाही, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.