लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : महावितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता मोहम्मद फारूख शेख यांना दोरीने बांधून ठेवल्याच्या प्रकरणात आमदार मंगेश चव्हाण यांच्यासह ३१ जणांना सोमवारी अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश छाया पाटील यांनी अटी, शर्ती व १५ हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला. त्यात न्यायालयाच्या परवानगीशिवाय महाराष्ट्र राज्याबाहेर जाण्यास मनाई केली आहे.
आमदार मंगेश चव्हाण यांच्यासह ३१ जणांनी २६ मार्चला महावितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता मोहम्मद फारुख शेख यांना दोरीने बांधून ठेवून कार्यालयाला कुलूप ठोकले होते. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर लगेचच या सर्वांना अटक करण्यात आली होती.
आमदार मंगेश चव्हाण व इतर २५ जणांचा अर्ज ॲड. गोपाळ जळमकर तर ॲड अकील इस्माईल यांनी चांगदेव तुकाराम राठोड, भास्कर लखा पाटील, बदामराव श्रावण पाटील, अशोक पुंडलिक पाटील, संजय रतनसिंग पाटील व संजय भास्कर पाटील या सहा जणांचा अर्ज दाखल केला होता. त्यावर १ एप्रिलला युक्तिवाद झाला होता. सोमवारी न्यायालयाने जामीन मंजूर केला.
अशा आहेत अटी
- दर सोमवार, मंगळवारी सकाळी ९ ते १२ या वेळेत चाळीसगाव पोलीस ठाण्यात हजेरी
- पुन्हा असा गुन्हा करायचा नाही
- साक्षीदारांना धमकी तसेच आमिष दाखवू नये
- दोषारोप पत्र दाखल होईपर्यंत कोर्टाच्या परवानगीने महाराष्ट्राच्या बाहेर जाऊ नये
- पासपोर्ट पोलीस ठाण्यात जमा करावा