लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव -शहराचे आमदार सुरेश भोळे हे एकीकडे सागर पार्कबाबत आपले प्रेम व्यक्त करतात आणि दुसरीकडे सागर पार्क मैदानावर होणारे विकास काम थांबविण्याच्या सूचना मनपा आयुक्तांना देत आहेत. शहरात एकही विकासाचे काम केले जात नाहीत आणि ज्याठिकाणी विकासाचे काम हाेत आहेत, त्या ठिकाणच्या कामांमध्ये खोडा घालण्यात आमदार सुरेश भोळे अग्रेसर असल्याचा आरोप शिवसेनेचे नगरसेवक प्रशांत नाईक यांनी सोशल मीडियावर व्हायरल केलेल्या पोस्टमध्ये केला आहे.
सागर पार्कच्या जागेवर होत असलेल्या जॉगिंग ट्रॅकच्या कामावरून आता शिवसेना व भाजप आमने-सामने आले आहेत. शिवसेनेचे गटनेते अनंत जाेशी यांनी सागर पार्कवर जॉगिंग ट्रॅक व्हावा, यासाठी मनपात गेल्या आठवड्यात उपोषण केले होते, तर मंगळवारी आमदार सुरेश भोळे यांनी आयुक्त सतीश कुलकर्णी यांची भेट घेत हे काम थांबविण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे शिवसेना-भाजपकडून आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. शिवसेना नगरसेवक प्रशांत नाईक यांनी सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल केली असून, यामध्ये आमदार सुरेश भोळे यांच्यावर तीव्र शब्दात टीका केली आहे.
काम थांबविण्यामागे आमदारांचा रस का?
सागर पार्कचे काम रद्द करा, अशी मागणी आमदार सुरेश भोळे करत असून, हे काम रद्द करण्याचे कारण न समजण्यासारखे आहे. जळगाव शहराच्या लाडक्या आमदारांना ही गोष्ट न शोभणारी असल्याची टीका प्रशांत नाईक यांनी केली आहे. सागर पार्कवर विकास कामे झाले तर अनेक प्रश्न मार्गी लागणार असून, याठिकाणी येणाऱ्या नागरिकांनादेखील फायदा होणार आहे; मात्र आमदार हे काम रद्द करण्यासाठी अडून बसले आहेत. आमदार भोळे यांनी ही मागणी करण्याआधी याठिकाणी खेळणाऱ्या युवकांना विश्वासात घ्यायला होते; मात्र त्यांनी युवकांना विश्वासात घेतले नसल्याचे नाईक यांनी म्हटले आहे.