बुलडाणा - राज्यातील १८ लाख सरकारी कर्मचारी सध्या संपावर असल्याने नागरिकांचे मोठे हाल होत आहेत. एकीकडे अवकाळीमुले शेतकरी हैराण आहे, तर दुसरीकेड तलाठी बाबू कार्यालयात नसल्याने पंचनामे कोण करणार म्हणूनही बळीराजा त्रस्त आहे. मात्र, आपल्या मागणीवर हे संपकरी अडून बसले आहेत. त्यामुळे, या कर्मचाऱ्यांना सोशल मीडियातून ट्रोल केलं जातंय. तर, अनेकजण आपलं मतही संपाबाबत मांडत आहेत. शिंदे गटाचे नेते आणि आमदारसंजय गायकवाड यांनी संपातील कर्मचाऱ्यांचा निषेध व्यक्त केला होता. त्यामुळे, संतप्त कर्मचाऱ्यांनी आमदार गायकडवा यांच्याही विधानाचा निषेध नोंदवलाय.
जुनी पेन्शन योजना लागू करावी, या मागणीसाठी राज्यातील शासकीय निमशासकीय कर्मचारी १४ मार्चपासून बेमुदत संपावर आहेत. या संपकरी कर्मचाऱ्यांना शिवसेनेचे शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी बेजबाबदार व निषेधार्थ असल्याचे म्हटलं होतं. आमदार गायकवाड यांच्या या विधानाचा निषेध जळगाव जिल्ह्यातील चोपडा पंचायत समितीच्या आवारात करण्यात आला.
येथील पंचायत समितीच्या विविध विभागाचे कर्मचारी जुनी पेन्शन योजनेसाठी पेंडॉल टाकून बसले आहेत. त्या ठिकाणी आमदार संजय गायकवाड यांच्या फोटोला चप्पला मारण्यात आल्या. तसेच महिला कर्मचाऱ्यांनी बांगड्या दाखवून व फोटोला काळ्या शाईने क्रॉस करून निषेध व्यक्त केला. यावेळी आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधात घोषणाही देण्यात आल्यात. तसेच, बेताल वक्तव्य करणाऱ्या अशा आमदारांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीदेखील संपातील कर्मचाऱ्यांनी केली आहे.