लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : अजिंठा शासकीय विश्रामगृहात आमदार प्रणिता शिंदे यांनी घेतलेल्या काँग्रेस पक्षाच्या बैठकीत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी लागू केलेल्या नियमांचे उल्लंघन केले म्हणून काँग्रेस आमदार शिरीष चौधरी, जिल्हाध्यक्ष ॲड. संदीप पाटील, माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांच्यासह २० ते २५ काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांविरुद्ध मंगळवारी रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
काँग्रेस पक्षाच्या आमदार प्रणिती शिंदे १५ मे रोजी जळगाव जिल्हा दौऱ्यावर होत्या. त्यांच्या उपस्थितीत अजिंठा शासकीय विश्रामगृहावर दुपारी एक ते सायंकाळी पाच या कालावधीत पक्षाचे पदाधिकारी व महत्त्वाच्या कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीचे आयोजन जिल्हाध्यक्ष ॲड. संदीप पाटील व इतर पदाधिकाऱ्यांनी केले होते. बैठक घेण्यापूर्वी पक्षाने पोलीस व जिल्हा प्रशासनाची कोणतीही परवानगी घेतलेली नव्हती तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर फिजिकल डिस्टन्सिंगचा अभाव होता, तर काहीजण विनामास्क होते. कोरोनाचा संसर्ग पसरविण्यास ही कृती कारणीभूत ठरली. जिल्हाधिकाऱ्यांनी लागू केलेल्या सर्वच नियमांचे उल्लंघन या बैठकीत करण्यात आले होते.
यांच्यावर दाखल झाला गुन्हा
रावेरचे काॅंग्रेस आमदार शिरीष चौधरी, पक्षाचे जिल्हाध्यक्ष ॲड. संदीप पाटील, माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, युवक जिल्हाध्यक्ष हितेश पाटील, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष सुलोचना वाघ, माजी अध्यक्ष उदय पाटील, जिल्हा परिषदेचे गटनेते प्रभाकर सोनवणे, श्याम तायडे यांच्यासह इतर २० ते २५ पदाधिकारी व कार्यकर्ते यांचा त्यात समावेश आहे. पोलीस अंमलदार हर्षल सुभाष पाटील यांनी फिर्याद दिलेली आहे. भादंवि कलम १८८, २६९ आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ चे कलम ५१ (ब) महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) (३) चे उल्लंघन १३५ प्रमाणे गुन्ह्याची नोंद झालेली आहे. तपास हवालदार सुनील पाटील करीत आहे.