प्रशांत भदाणे
जळगाव - मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांकडून एका उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. राज ठाकरेंच्या ५४ वाढदिवसानिमित्त काहीतरी वेगळं करावं म्हणून जळगावातील मनसैनिकांनी ५४ रुपये लिटर दरानं पेट्रोल वाटपाचा कार्यक्रम राबवला. परंतु नंतर हा उपक्रम त्यांच्याच अंगलट आल्याचं चित्र निर्माण झालं.
दरम्यान, ५४ रुपये प्रति लिटर पेट्रोल मिळत असल्याची बातमी मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आणि पेट्रोल पंपावर लोकांची मोठी गर्दी उसळली. त्यामुळं पंपावरील कर्मचाऱ्यांची तारांबळ उडाली. इतकंच काय तर यानंतर पंपच बंद करण्यात आला. तर दुसरीकडे पेट्रोल मिळत नाही म्हणून लोकांचाही संताप झाला. मात्र या गोंधळात मनसैनिकांनी डोक्यावर हात मारून घेतला. नागरिकांनी गोंधळ घातल्याने हा उपक्रम गुंडाळण्याची नामुष्की मनसेवर ओढावली.
“इथे ५४ रूपये लिटरनं पेट्रोलची विक्री करण्यात येत होती. परंतु अडचणीमुळे मला पंप बंद करावा लागतो. बातमी व्हायरल झाल्यामुळे गर्दी झाली,” असं पेट्रोल पंपाच्या मालकांनी सांगितलं. राज ठाकरे यांचा वाढदिवस मोठ्या दणक्यात साजरा करण्याचं मनसैनिकांचं नियोजन होतं. मात्र या सार्या गोंधळामुळे ते फसल्याचंच चित्र निर्माण झालं.