लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : अख्खे जग जवळ आणणेल्या इंटरनेट व अन्य तंत्रज्ञानाने परिपूर्ण असलेल्या आपल्या मोबाईलमुळे आपण क्षणात इच्छित व्यक्तीशी संपर्क साधू शकत असलो तरी याच मोबाईलमुळे आपण स्मरण करणे टाळत असल्याचे समोर येत आहे. आपल्या हाती असलेल्या स्मार्ट फोनमुळे सर्व जण ‘स्मार्ट’ झालो खरे मात्र, तोंडपाठ असणारे दूरध्वनी क्रमांक आता कुणी लक्षातही ठेवत नसल्याने मेंदूला आळसपणा येत आहे की काय अशीच स्थिती निर्माण होत आहे.
अन्न, वस्त्र, निवारा याबरोबरच मोबाइलही आता जीवनावश्यक गरज बनलेला आहे. घरातून बाहेर पडताना मोबाइलची इतकी सवय झाली आहे की, अनेक जण काही महत्त्वाच्या गोष्टी विसरतील मात्र मोबाईल सोबत बाळगणे विसरत नाही. गेल्या काही दिवसांत कोणीही भेटले किंवा नवीन ओळख झाली की, त्यांचा नंबर नावाने मोबाइलमध्ये ठेवण्याची सवय लागली आहे. कोणाला फोन करायचा झाल्यास त्या-त्या नावाने नंबर शोधून थेट डायल करण्याच्या सवयीने अनेकांना स्वत:च्या दुसऱ्या नंबरसह कुटुंबीयांचेही नंबर पाठ नसल्याचे समोर येत आहे.
बाजारात उपलब्ध असलेले बहुतांश मोबाइल हे डबल सिमचे आहेत. एका कार्डला रेंज नसेल तर दुसऱ्याला रेंज मिळेल, या शक्यतेने अनेकांकडे दोन कार्ड आहेत. बहुतांश लोकांना आपल्या स्वत:चा दुसरा नंबरही पाठ नसल्याचे निदर्शनास आले आहे. मोबाइलमध्ये नंबर शोधून तो डायल करण्याची सवय लागल्याने नंबर पाठ करण्याचा प्रश्न नाही. दुसरे म्हणजे स्वत:च स्वत:ला फोन करत नाही.
असे का होते?
कोणत्याही बाबतीत मनुष्याची एक मानसिकता तयार झालेली असते. शिवाय ज्या गोष्टी आपल्याला लागणार आहे, ते स्मरणात ठेवण्याची मेंदूची नैसर्गिक क्षमता असते. ज्या गोष्टी आपल्याला लागणार नाही, त्या सहजासहजी स्मरणात राहत नाही व मेंदूही तसे कार्य करीत नाही. आता मोबाईलच्या बाबतीतही तसेच होत असून कोणाचाही क्रमांक आपण मोबाईलमध्ये नोंद (सेव्ह) करीत असल्याने ते क्रमांक स्मरणात ठेवले जात नाही.
हे टाळण्यासाठी :
मोबाईल, दूरध्वनी क्रमांक असो अथवा इतर कोणत्याही गोष्टी स्मरणात ठेवायच्या असतील तर मेंदूला व्यायाम आवश्यक आहे. ज्या प्रमाणे आपण शरीरासाठी व्यायाम करतो, त्या प्रमाणे आठवण राहण्यासाठी वेगवेगळ्या गोष्टींची उजळणी आवश्यक असून त्याद्वारे मेंदूचा व्यायाम होतो व वेगवेगळ्या गोष्टी स्मरणात राहू शकतात.
मुलांना, आजोबाला नंबर्स पाठ, कारण...
दूरध्वनी, मोबाईल क्रमांक लक्षात ठेवण्यात तरुणाईच्या तुलनेत ज्येष्ठ आघाडीवर आहे. पूर्वीपासून घरात साधा फोन वापरण्याची सवय असल्याने त्यांच्या मेंदूला हे नंबर पाठ करण्याची सवय लागली आहे. घरातच असल्याने त्यांच्याकडे कुटुंबीयांनी नाकारलेला फोन येतो. घाई गडबडीत त्याचे चार्जिंग नित्यनियमाने होईल, याची खात्री त्यांना नसते. म्हणून डायरीमध्ये आणि कॅलेंडरवर ते नंबर लिहितात. त्यातून पाहून नंबर डायल करण्याची सवय लागल्याने, त्यांना अन्य कुटुंबीयांच्या तुलनेत सर्वाधिक नंबर पाठ असतात. अशाच प्रकारे लहान मुलांचेही हे क्रमांक पाठ असतात. यामध्ये पवार कुटुंबातील आजोबा ते नातू अशा तीन जणांशी चर्चा केली असता, ही बाब प्रकर्षाने जाणवली. या कुटुंबातील प्रल्हाद पवार यांचे अनेक क्रमांक तोंडपाठ आहे.त्यांचा मुलगा राहुल पवार हे मोबाईलमध्ये क्रमांक सेव्ह करीत असल्याने त्यांचे क्रमांक तोंडपाठ नव्हते तर राहुल पवार यांचा मुलगा आयुष याचेही प्रमाणात क्रमांक पाठ होते.
---------
कोणत्याही बाबतीत मनुष्याची एक मानसिकता असते. ज्या गोष्टी आपल्याला लागणार आहे, त्यांचे स्मरण मनुष्य व्यवस्थित ठेवतो. मात्र जे लागणार नाही, ते मेंदूतही साठविले जात नाही. मेंदूची ही एक नैसर्गिक क्षमता असते. मोबाईलमुळे आता कोणाचेही क्रमांक सेव्ह केले जात असल्याने कोणीही ते स्मरणात ठेवत नाही. मात्र स्मरणासाठी मेंदूचा व्यायाम होणे महत्त्वाचे आहे. यासाठी वारंवार वेगवेगळ्या गोष्टींची उजळली करावी.
- डॉ. सतीश पाटील, मानसोपचार तज्ज्ञ जळगाव