खाटीक मोहम्मद नाजीम अलाम यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या माहितीनुसार, ६ किंवा ७ जुलै रोजी ॲमेझॉनमधून बोलत असल्याचे सांगून आलीम यांना एका अनोळखी क्रमांकावरून कॉल आला. समोरील व्यक्तीने १६ हजार ५०० रुपये किमतीचा मोबाईल अवघ्या सहा हजार रुपयात दिला जाईल, असे आमिष दाखविले. अलाम तयार झाल्यावर ऑनलाईन रक्कम ट्रान्सफर करायला सांगितली असता, आपण ऑनलाईन व्यवहार करणार नाही. सरकारच्या पोस्टाच्या माध्यमातून तुम्ही मोबाईल पाठवा, त्यानंतर मी तेथेच रकमेचा भरणार करेन, असे त्यांना सांगितले. त्यानुसार समोरील व्यक्तीने संपूर्ण पत्ता लिहून घेत स्पीड पोस्टाने मोबाईल येईल, असे सांगितले.
बूट, बेल्ट पाहताच मारला डोक्याला हात
सोमवारी दुपारी आलम यांना पुन्हा ॲमेझॉनच्या नावाने कॉल आला व तुमचे पार्सल पोस्टात आल्याचे सांगितले. त्यानुसार अलाम पांडे चौकातील मुख्य पोस्टात गेले असता पार्सल घेण्याआधी त्यांना सहा हजार रुपये भरणा करायला लावले. ही रक्कम भरल्यानंतर हातात घेतलेल्या पार्सलमध्ये मोबाईलऐवजी दुसरीच वस्तू असल्याचे जाणवले, त्यामुळे त्यांनी पोस्टातील कर्मचाऱ्यांच्या समक्षच पार्सल उघडले असता त्यात मोबाईल नव्हताच. बूट, बेल्ट व पाकीट या तीन वस्तू निघाल्या. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर अलाम यांनी डोक्याला हात मारुन घेतला. ज्या क्रमांकावरून कॉल आला, त्यावर पुन्हा कॉल करून माहिती दिली. पोलीस तसेच पत्रकारांना माहिती देतो, असे सांगितले असता समोरील व्यक्तीने आमचा माणूस पैसे द्यायला येईल, तुम्ही पोलिसात तक्रार देऊ नका तसेच प्रसारमाध्यमांकडेही जाऊ नका, असे सांगितले. परंतु सायंकाळपर्यंत फसवणूक झालेली रक्कम मिळालीच नाही.