जळगाव : घराच्या खिडकीत चार्जिंगसाठी ठेवलेला साडेअकरा हजार रुपये किमतीचा मोबाइल अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना पिंप्राळा-हुडको येथे बुधवारी रात्री ८.१५ वाजेच्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी जयभीम दयाराम सोनवणे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पिंप्राळा-हुडको येथे जयभीम सोनवणे हे कुटुंबीयांसोबत राहतात. रिक्षा चालवून ते कुटुंबीयांचा उदरनिर्वाह करतात. बुधवारी नेहमीप्रमाणे जयभीम यांनी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास घराच्या खिडकीत त्यांचा मोबािल चार्जिंगसाठी ठेवला होता. त्यानंतर ते घराबाहेर निघून गेले. रात्री सव्वाआठ वाजेच्या सुमारास घरात आल्यानंतर खिडकीत ठेवलेला मोबाइल त्यांना गायब झालेला दिसून आला. घरात शोध घेऊनही मिळून न आल्यामुळे चोरी झाल्याची खात्री त्यांना झाली. अखेर गुरुवारी रामानंदनगर पोलीस ठाणे गाठून त्यांनी तक्रार दिली. त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.