जळगाव : रेल्वेने ब-हाणपुर येथून जळगावात यायचे आणि दिवसभर किंवा रात्री चार ते पाच मोबाईल लांबविले की पुन्हा रेल्वेने ब-हाणपुर जायचे अशा नेहमीच चो-या करणा-या सुलेमान रहेमान तडवी (२२, रा.लोणी, जि.ब-हाणपुर, मध्य प्रदेश) या चोरट्याच्या रामानंद नगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. त्याच्याकडून महागडे दोन मोबाईल हस्तगत करण्यात आले आहेत.रामानंद नगर पोलिसांच्या हद्दीतून रात्रीच्या वेळी अनेक मोबाईल चोरी गेले होते. कोणी गच्चीवर झोपलेले असताना किंवा गारवा येण्यासाठी दरवाजा उघडे ठेवून झोपणा-या लोकांचेच मोबाईल मोठ्या प्रमाणात लांबविण्यात आले होते. याबाबत रामानंद नगर पोलिसात गुन्हेही दाखल झालेले होते.
२० हजार रुपयांचा मोबाईल चोरी गेल्याच्या गुन्ह्याचा तपास करीत असताना हा मोबाईल सुलेमान याच्याकडे असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे पोलीस निरीक्षक दीपक बुधवंत यांनी गुन्हे शोध पथकाचे सहायक फौजदार गोपाळ चौधरी, प्रदीप चौधरी, विजय खैरे, अनमोल पटेल, शरद पाटील, विलास शिंदे, रवींद्र पाटील, किरण धनगर व ज्ञानेश्वर पाटील यांचे एक पथक लोणी, ब-हाणपुर येथे रवाना केले होते, मात्र संशयित हा तेथे नव्हता. गुरुवारी तो भजे गल्लीत आल्याची माहिती विजय खैरे व विलास शिंदे यांना मिळाली. त्यानुसार पथकाने त्याला सकाळीच भजे गल्लीत घेरले. त्याच्याजवळ चोरीचे दोन मोबाईल आढळून आले. आणखी बरेच मोबाईल त्याच्याकडून हस्तगत होण्याची शक्यता आहे.