जळगाव : गेल्या काही दिवसांपासून नवीन बसस्थानकावर भुरट्या चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. एकाच बसमधून दोन महिलांची सोन्याची पोत चोरीला गेल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली असतानाच, पुन्हा गर्दीचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्याने जितेंद्र हुकूमचंद शर्मा (रा. पारोळा) या प्रवाशाच्या खिशातून बसमध्ये चढत असताना मोबाइल लांबविल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
पारोळा येथील कासार गल्लीत जितेंद्र शर्मा हे कुटुंबीयांसह वास्तव्यास आहेत. काही कामानिमित्त ते खंडवा येथे गेले होते. मंगळवार, ५ जानवोरीला ते जळगाव नवीन बसस्थानकावर पारोळा येथे जाण्यासाठी पोहोचले. रात्री ८.३० वाजेच्या सुमारास फलाटावर पारोळा बस लागली. बसमध्ये चढत असताना गर्दी झाली. हीच संधी साधत चोरट्याने त्यांच्या खिशातील दहा हजार रुपये किमतीचा मोबाइल चोरून नेला. बसमध्ये चढल्यानंतर त्यांनी खिशाला हात लावला असता, मोबाइल गायब झालेला दिसून आला. त्यांनी लागलीच इतर प्रवाशांना मोबाइलबाबत विचारणा केली. मात्र, कुणालाही मोबाइल दिसून आला नाही. अखेर तो चोरी झाल्याची खात्री झाली. शुक्रवारी जितेंद्र शर्मा यांनी जिल्हापेठ पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मंगलपोत चाेरीनंतर मोबाइलची चोरी
गेल्या काही दिवसांपासून नवीन बसस्थानकावर भुरट्या चोरट्यांनी डोके वर काढले आहे. दोन ते तीन दिवसांच्या आड चोरीच्या घटना घडत आहेत. काही दिवसांपूर्वी एकाच बसमधून दोन महिलांच्या सोन्याच्या मंगलपोत चोरट्यांनी लांबविल्या होत्या. त्यानंतर आता मोबाइल चोरून नेला. त्यामुळे बसमध्ये चढताना सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.