ऑनलाईन लोकमत
भुसावळ, दि.14 : मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातर्फे रेल्वेच्या स्थानिक कोचींग कॉम्प्लेक्समध्ये गुरुवारी राबविण्यात आलेल्या ‘मॉकड्रील’चा अनेकांनी थरार अनुभवला. रेल्वे अपघातांच्या प्रमाणात वाढ झाल्यामुळे सर्व संबंधित विभागातील अधिकारी, कर्मचारी किती सतर्क आहेत व अपघात झाल्यानंतर ते कितीवेळात घटनास्थळी दाखल होतात याच्या प्रात्याक्षिकासाठी ‘मॉकड्रील’ घेण्यात आले.
सकाळी 11.15 वाजता कोचींग कॉम्प्लेक्समध्ये शटींग करण्याचे काम सुरू असताना डब्यावर डबे चढून अपघात झाला. यात किमान तीन रेल्वे कर्मचारी ठार झाले आणि 13 कर्मचारी जखमी झाले असा संदेश डीआरएम कार्यालयातील नियंत्रण कक्षाला देण्यात आला. या संदेशानंतर कॉम्प्लेक्समधील हूटर (सायरन) वाजविण्यात आला. लागोपाठ पाच भोंगे वाजल्याने रेल्वे अपघात गंभीर व मुख्यालयापासून लांब आहे. त्यामुळे काही क्षणाच्या आत भुसावळ रेल्वेतील दोन अॅक्सीडेंट रिलिफ ट्रेन (एआरटी), रेल्वे रुग्णालयातील वैद्यकीय पथक, स्काऊट-गाईड तातडीने दाखल झाले. एनडीआरएमचे जवान तैनात अपघात मोठा असल्याने पुण्याहून खास आलेले एनडीआरएमचे दोन अधिकारी आणि 28 जवानांचे पथक मदतीसाठी धावले. त्यांनी रेल्वे डबा क्रमांक सीआर- 92603 मध्ये अडकलेल्या जखमी रेल्वे कर्मचा:यांना डब्याच्या खिडक्यांचे गज कटरच्या सहाय्याने कापून स्ट्रेचरवरुन बाहेर काढले. जखमी रेल्वे कर्मचा:यांना आक्रोश.. अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांचा आक्रोश खरोखर अपघात झाल्यासारखा होता. प्रवाशांचा आक्रोश सुरु असताना आधी एआरटी पथकातील कर्मचारी अपघातग्रस्त डब्यात चढले व त्यांनी मदतकार्य सुरू केले. एनडीआरएफचे पथक लांबून येत असल्याने यानंतर ते आले व त्यांनी तातडीने कटरचा वापर करुन खिडक्यांचे गज कापले. पत्रा कापला. डब्याच्या छताचा पत्रा कापला. जखमींनी स्ट्रेचरच्या सहाय्याने बाहेर काढले. मॉकड्रीलचा प्रयोग तब्बल 45 मिनीटे राबविण्यात आला. यात भुसावळ रेल्वे विभागतील सर्व विभागातील अधिकारी, कर्मचारी सतर्क असल्याचे दिसून आल्याची माहिती वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक सुनील मिश्रा यांनी दिली.