जिल्हा युवक कॉँग्रेसची आदर्श निवडणूक प्रक्रिया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2018 12:49 PM2018-09-20T12:49:42+5:302018-09-20T12:50:03+5:30
- चंद्रशेखर जोशी
संघटनात्मक निवडणुका म्हटल्या म्हणजे राजकीय पक्षांची डोकेदुखी. त्यातच गटबाजीचे ग्रहण हे प्रत्येक राजकीय पक्षात असतेच. त्यामुळे ज्याचे संघटनेवर व केंद्र राज्यातील संघटनेवर प्राबल्य त्याची सरशी हे ठरलेले. राजकीय संघटनांना विविध पदांवर नियुक्त्या देणे सोपे. कारण काही काळ वाद, टीका टिप्पणी झाली की सारे काही शांत होते. निवडणुकीची प्रक्रिया राबविण्यापेक्षा राजकीय पक्ष निवड करून मोकळे होणे याच पद्धतीचा अवलंब बऱ्याच वेळेस करत असतात. पण जेव्हा एखादा पक्ष आपल्या संघटनेत निवडणुकीचा कार्यक्रम घोषित करून त्याची प्रामाणिकपणे अमंलबजावणी करतो, ती एक आदर्श निवडणूक पद्धती ठरते. कॉँग्रेस पक्षावर विरोधक चहुबाजूंनी चुका करत असतात. सत्तेबाहेर असताना या पक्षाने नुकतीच एक निवडणूक प्रक्रिया राबविली. राज्यापासून तर जिल्हा पातळीपर्यंत यासाठी निरीक्षक नेमून निवडणूक घेतली. ही निवडणूक युवक कॉँग्रेस अंतर्गत झाली. नेहमीप्रमाणे अगोदर युवक सदस्यांची नोंदणी झाली, त्यांना सभासदत्व दिले गेले व नंतर तालुका अध्यक्षांपासून तर जिल्हाध्यक्षपदांची निवडणूक घेण्यात आली. जळगाव जिल्ह्यात युवक कॉँग्रेसची निवड प्रक्रिया नुकतीच झाली. युवक काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदाच्या चुरशीच्या निवडणुकीत प्रा. हितेश सुभाष पाटील यांनी कॉँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस अॅड. ललिता पाटील यांचे चिरंजीव व जळगाव लोकसभा मतदारसंघाचे युवक अध्यक्ष पराग पाटील यांचा अवघ्या ३० मतांनी पराभव केला. प्रा.पाटील यांना एकूण १०३८ मिळाली. जिल्ह्याच्या राजकीय पटलावर फारसा प्रभाव प्रा. पाटील यांचा नाही. त्या तुलनेत त्यांचे प्रतिस्पर्धी पराग पाटील यांना राजकीय पार्श्वभूमी आहे. असे असताना प्रा. हितेश पाटील यांनी कार्यपद्धती निश्चित करून निवडणूक लढविली. जिल्ह्यात युवकांचे जाळे निर्माण करून पक्षाचा विचार त्यांनी पोहोचविला व विजश्री मिळविली. पक्षाकडून एकदम निवड होऊन पदाधिकारी लादण्यापेक्षा निवडणूक प्रक्रिया राबवून निवड होणे हे केव्हाही योग्य. लोकशाही पद्धतीने होणारी ही निवड आदर्श तर आहेच पण युवकांनाही एक दिशा देणारी ही पद्धती म्हणावी लागेल.