आनंद सुरवाडे
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : सेवाभावी संस्थांची प्रशासनाला साथ मिळाल्यानंतर गरजवंताना कशी उत्तम आरोग्य सेवा मिळते, याचे जीवंत उदाहरण म्हणून मोहाडी येथील कोविड रुग्णालय सद्यस्थितीत कोविड उपचारासाठीचे रोल मॉडेल ठरत आहे. या ठिकाणी रुग्णांना अत्याधुनिक व खासगी रुग्णालयाच्या तोडीस उपचार मिळत असल्याने या ठिकणाहून दोन महिन्यात ११६० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
जिल्हाधिकारी अभिजित राऊत, जि.प.सीईओ डॉ. बी. एन. पाटील, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण, नोडल अधिकारी डॉ. यु.बी. तासखेडकर, आयुर्वेद महाविद्याचे अधिष्ठाता डॉ. मिलिंद निकुंभ यांची प्रशासकीय पातळीवर मोहाडी रुग्णालयात प्रमुख भूमिका असून डॉ.रितेश पाटील हे या ठिकाणी समन्वयक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. पॅथॉलॉजीत रक्ताच्या तपासण्या मोफत केल्या जातात.
१२० रुग्णांची व्यवस्था
३१ रुग्ण दाखल
मृत्यू ०१
बरे झालेले ११६०
रोजगारही सेवाही
मध्यप्रदेश येथून चार परिचारिका आलेल्या असून त्या या ठिकाणी सेवा देत आहेत. यासह जळगावातून २८ गरजू तरूणांना शोधून कक्षसेवकाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. रुग्णांची सर्व सुश्रूषा करण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे. तरूणांना रोजगारही मिळाला असून त्यातून सेवाभावही साधला जात आहे. त्यांची राहण्याची व जेवणाची व्यवस्था ही रुग्णालयातच करण्यात आली आहे.
या संस्थानी केले प्रशासनाचे हात मजबूत
१ सेवारथ संस्थेतर्फे डॉ. रितेश पाटील, डॉ. निलीमा सेठीया, दिलीप गांधी, पुखराज पगारिया, चंद्रशेखर नेवे यांच्या माध्यमातून ८ रुग्णवाहिका, ४५ ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर देण्यात आले आहेत.
२ लेवा पाटीलदार स्पोर्टस फाऊंडेशन, मराठा प्रिमियर लिग यांच्या माध्यमातून चंदन कोल्हे, महेश चौधरी, नितीन धांडे, हिरेश कदम, श्रीराम पाटील या ठिकाणी रुग्ण, नातेवाईक आणि स्टाफसाठी जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. रुग्णालयाच्या आवारातच एकात खोली स्वतंत्र किचन असून या ठिकाणचे ताजे जेवण रुग्णांना दिले जात आहे.
३ रेडक्रॉस रक्तपेढीकडून या ठिकाणी ६ ड्युरा सिलिंडर देण्यात आले आहेत.
४ रोटरी क्लबकडून ६० बेडची ऑक्सिजन पाईपलाईन केली असून डॉ.राजेश पाटील यांनी ही जबाबदारी सांभाळली
५ जैन उद्योग समूहाकडून या ठिकाणी ७० सर्जिकल बेड देण्यात आले आहेत.
डॉनने वाचविले दोघांना
रुग्णालयात किचन मॅनेजमेंट सांभाळणारा डॉन शर्मा या तरूणांने डॉक्टरांसोबत राहून सर्व पायाभूत बाबी आत्मसात करून घेतल्या आहेत. टास्क फोर्सच्या सदस्यांनी त्याला रुग्णाची प्रकृती कशी हे ओळखण्यासाठी एक ट्रीक सांगितली असून येता जाता रुग्णांशी संवाद साधायचा त्यांना नमस्कार करायचा रुग्णाकडून त्याच जोमाने प्रतिसाद आला म्हणजे रुग्ण उत्तम, दोन वेळा वाट पाहायची रुग्णाकडून प्रतिसाद न आल्यास त्याच्या श्वाच्छोश्वासाकडे लक्ष द्यायचे तो कमी जास्त होत असेल तर तातडीने डॉक्टरांना कळवायचे, डॉनने हा प्रयोग साततत्याने केला. त्याला नमस्कार केल्यानंतर दोन रुग्णांकडून प्रतिसाद न आल्याने त्याने श्वाच्छोश्वास तपासला आणि तातडीने डॉक्टरांना कळविले, डॉक्टरांनी तातडीने रुग्णांना तपासून त्यांना सिव्हीलला पाठविले. डॉन शर्मा हा महाबळ येथील रहिवासी असून तो रिक्षाचालक आहे. मात्र, रुग्णसेवेत खरे समाधान मिळत असल्याचे तो सांगतो.
प्रशासकीय व सेवाभावी संस्था यांच्या समन्वय व एकत्रीतपणातून गरजूंना अत्यंत चांगली सेवा उपलब्ध केली जावू शकते, तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी तालुकास्तरावर असे एकत्रितकरण झाल्यास तिसरी लाट थोपविणे शक्य होऊ शकते. - डॉ. रितेश पाटील, समन्वयक