वासुदेव सरोदे ।फैजपूर , ता.यावल, जि.जळगाव : दिल्ली येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बौद्धिक शिबिरात संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी १९३६ च्या फैजपूर काँग्रेसच्या अधिवेशनाच्या आठवणींना उजाळा दिला, मात्र त्याचे निमित्त वेगळे होते.
काँग्रेस अधिवेशनावेळी ८० फूट उंचीवर अडकलेला तिरंगा झेंडा फैजपूरच्या किसनसिंग राजपूत या तरुणाने खाली पडू न देता, वर चढून फडकविला. त्यावेळी त्याचे पंडित जवाहरलाल नेहरू यांनी त्याचे कौतुक केले, मात्र राजपूत केवळ संघाचा कार्यकर्ता होता म्हणून त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला नाही, अशा काँग्रेसच्या भूमिकेबद्दल त्यांनी खेद व्यक्त केला. या शिबिराला देशातील सहाशेवर राजदूत यांची उपस्थिती होती. दिल्ली येथील विज्ञान भवनात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे बौद्धिक शिबिर सोमवारपासून सुरू झाले आहे. या शिबिराचे खासगी वृत्तवाहिन्यांनी थेट प्रक्षेपण केले. या शिबिरात ‘संघाच्या नजरेतून भविष्यातील भारत’ या विषयावर उपस्थितांना संबोधित करताना मोहन भागवत यांनी जळगाव जिल्ह्यातील फैजपूर येथील १९३६ च्या काँग्रेस ग्रामीण अधिवेशनाची आठवण काढली. या अधिवेशनात ८० फूट उंचीवर तिरंगा झेंडा फडकवायचा होता. झेंडा फडकवताना तो मध्येच अडकला. झेंडा खाली न पडू देता या अधिवेशनाला उपस्थित असलेला किसनसिंग राजपूत या तरुणाने आपले कौशल्य दाखवत स्तंभावर चढत अडकलेल्या झेंड्याची गाठ सोडून तो झेंडा अभिमानाने फडकविला. त्यानंतर किसनसिंग यांचे पंडित नेहरू यांनी पाठ थोपटून त्याला शाबासकी दिली. मात्र त्यावेळी राजपूती यांचा व्यासपीठावर सत्कार करण्याचे सांगितले. त्यावेळी तो संघाचा कार्यकर्ता असल्याने त्यांचा जाहीर सत्कार झाला नाही, याची खंत भागवत यांनी विज्ञान भवनाच्या या शिबिरात उपस्थितांना करून दिली. मात्र त्याचा सत्कार भेट वस्तू देऊन डॉ.हेडगेवार यांनी केला होता, याची आठवणही त्यांनी या वेळी करून दिली.
राजपूत कुटुंबाबद्दल काँग्रेसमध्ये नेहमीच आदर -शिरीष चौधरीसंघाच्या दिल्लीमधील शिबिरात फैजपूरमधील १९३६च्या काँग्रेस ग्रामीण अधिवेशनाचा उल्लेख संघाचे अध्यक्ष मोहन भागवत यांच्याकडून होणे ही कौतुकास्पद बाब आहे. अधिवेशन स्थळी ८० फुटावरील तिरंगा झेंडा फडकविण्यासाठी किसनसिंग राजपूत यांचे योगदान काँग्रेससाठी नेहमी स्मरणीय आहे. त्यांना काँग्रेसजन कधीच विसरणार नाही. त्यांचा त्यावेळीसुद्धा योग्य सन्मान झाला होता व भविष्यातसुद्धा त्यांचा वारसांचा योग्य तो सन्मान राखला जाईल, अशी माहिती फैजपूर अधिवेशनाचे आयोजक स्वातंत्र्यसैनिक धनाजी नाना चौधरी यांचे नातू तथा माजी आमदार शिरीष चौधरी यांनी दिली.