खड्डे बुजविले
जळगाव : अयोध्यानगरातील मुख्य रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. मात्र, या खड्ड्यांमुळे काही प्रमाणात माती टाकून हे खड्डे तात्पुरते प्रमाणात बुजवण्यात आले आहे. मात्र, तेही पूर्णत: बुजवले नसल्याने रस्त्याची दयनीय अवस्था कायम आहे.
कचऱ्याचे साम्राज्य
जळगाव : शहरातील जुन्य बी. जे. मार्केट परिसराच्या मागील बाजूस कचऱ्याचे ढीग पडले असून स्वच्छतेच्या दृष्टीने या परिसरात कुठलीही पावले उचलली जात नसल्याचे गंभीर चित्र आहे. विशेष बाब म्हणजे हा वर्दळीचा भाग आहे. या परिसरात अनेक दुकानेदेखील असून रोगराई पसरण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
११ तालुक्यात कोरोनाला सुट्टी
जळगाव : जिल्ह्यातील ११ तालुक्यांमध्ये रविवारी एकही कोरोनाबाधित रुग्ण आढळून आलेला नाही. यात अमळनेर, चोपडा, पाचोरा, भडगाव, धरणगाव, यावल, एरंडोल, रावेर, चाळीसगाव, मुक्ताईनगर या तालुक्यांचा समावेश आहे. जळगाव शहरात मात्र, सातत्याने रुग्ण समोर येत आहेत.
बाहेरील चार रुग्ण
जळगाव : जळगावात इतर जिल्ह्यांतील उपचार घेणाऱ्या कोरोना रुग्णांची संख्या घटली आहे. ही संख्या ४ वर आलेली आहे. रविवारी दोन रुग्ण बरे झाल्याने ही संख्या घटली आहे. जिल्ह्यात ५०४ रुग्णांवर उपचार करण्यात आलेले आहेत. सुदैवाने कोणाचाही यात मृत्यू झालेला नाही. सद्यस्थितीत चार रुग्ण उपचार घेत आहेत.
सक्रिय रुग्ण वाढले
जळगाव : जिल्ह्यात काही दिवसांपासून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या नव्या रुग्णांपेक्षा कमी असल्याने सक्रिय रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. ही संख्या पुन्हा ४०१ वर पोहोचली आहे. यात रविवारी काहीसा दिलासा मिळाला आहे. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून रुग्णांची संख्या वाढत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.