लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जळगा शहरात मोकाट कुत्र्यांची दहशत कायम असून, गेल्या दोन महिन्यांत ६३६ जणांना कुत्र्यांनी चावा घेतल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे मनपा प्रशासन काय करतेय असा संतप्त सवाल नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे. या रुग्णावंर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार करण्यात आले आहेत.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात प्राणी चावल्यावर घ्यावयाचे इंजेक्शनसाठी दररोज बाधित रुग्ण उपचार करायला येतात. जुलै महिन्यात ३८८ जणांनी, तर ऑगस्ट महिन्यात २३ ऑगस्टपर्यंत २७४ जणांनी इंजेक्शन घेऊन उपचार घेतले. दरम्यान, यात सर्वाधिक उपचार हे कुत्रा चावल्यानंतर नागरिकांवर झालेले आहे. याशिवाय उंदीर चावल्यावर ५ पुरुष, १ मुलगा, मांजर चावल्यामुळे ५ पुरुष, ३ महिला, ३ लहान मुलं, घोडा चावला म्हणून १ पुरुष, तर गाय चावली म्हणून २ पुरुष, १ महिला व १ लहान मुलाने उपचार घेतले आहे.
दोन मृत्यू
मोकाट कुत्र्यांच्या चाव्यामुळे ममुराबाद शिवारात एका दहा वर्षीय बालकाला कुत्रा चावल्यानंतर रेबीजमुळे त्याचा मृत्यू झाला होता. यासह जळगावातील रेल्वे माल धक्क्यावर एका प्रौढालाही कुत्रा चावल्यामुळे महिनाभरानंतर त्याचा मृत्यू झाला होता. यासह एका महिलेच्या चेहऱ्याला पिसाळलेल्या कुत्र्याने अतिशय गंभीर चावा घेतला होता.
जुलै महिन्याची स्थिती
कुत्र्याचा चावा : ३६६
पुरुष : २२३
महिला : ६१
लहान मुले : ८२
ऑगस्ट महिन्याची स्थिती
कुत्र्याचा चावा : २७०
पुरुष : १६३
महिला : ६२
लहान मुले : ५५
कोट
भटक्या व पाळीव प्राण्यांपासून लहान मुलांना शक्यतोवर दूर ठेवा, कोणताही प्राणी चावला तर उपचार घेण्यासाठी तातडीने रुग्णालयात यावे. कुत्रा चावला तर जखमेवर परस्पर मलमपट्टी करू नये. वाहत्या पाण्याखाली जखम धुवावी. तत्काळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे इंजेक्शन घेण्यासाठी यावे. - डॉ. संगीता गावित, वैद्यकीय अधीक्षिका