जळगाव : मोकाट कुत्र्याला हाकलण्यासाठी दगड मारला म्हणून शेतातील सालदारांना पाच ते सहा तरूणांनी बेदम मारहाण केल्याची घटना २५ रोजी सायंकाळी पिंप्राळा शिवारात घडली. मात्र, याप्रकरणी गुन्हा न नोंदविता अदखपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी शेत मालक व सेवानिवृत्त सहाय्यक आयुक्त कुमारसिंग पाटील यांनी केली आहे.
एलआयसी कॉलनीतील रहिवासी कुमारसिंग पाटील यांचे पिंप्राळा शिवारात शेत आहे. याठिकाणी सुनील बारेला व शेरसिंग बारेला हे सालदार कुटूंबासह राहतात. २५ रोजी सायंकाळी शेतात पाळलेल्या कोंबड्यांमागे मोकाट कुत्रा लागला. त्याला हाकलण्यासाठी सुनील याने दगड मारला. जवळच पाच ते सहा तरूण बसलेले होते. त्यांनी कुत्र्याला दगड मारला म्हणून दोन्ही सालदारांना मारहाण केली. नंतर सालदारांच्या पत्नीला सुध्दा मारहाण केली. याबाबत रामानंदनगर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली़ त्यानुसार अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, मोठी घटना असताना संबंधितांवर गुन्हा दाखल केला गेला नाही. तसेच सहा आरोपी असताना तीन दाखविण्यात आले. संशयितांच्या हातात शस्त्रे असताना सुध्दा अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला. त्यामुळे संबंधित संशयितांसोबत अधिका-यांवर कारवाई करावी, अशी मागणी कुमारसिंग पाटील यांनी पोलीस अधीक्षकांकडे केली आहे.