नगरसेवक आयुक्तांचा पाणउतारा करीत असताना आरोग्य अधिकाऱ्यांना आले हसू
स्थायी सुरू होण्याआधीच मोकाट कुत्र्यांचा मुद्द्यावर नगरसेवकांचा संताप
‘लोकमत’च्या वृत्ताची दखल
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शहरात गेल्या काही दिवसांपासून मोकाट कुत्र्यांचा उच्छाद सुरू आहे. गेल्या आठवडाभरात १५ जणांना मोकाट कुत्र्यांनी चावा घेतला आहे. मोकाट कुत्र्यांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असतानाही मनपा प्रशासनाकडून कोणत्याही उपाययोजना केल्या जात नाहीत. ‘लोकमत’ने मोकाट कुत्र्यांचा प्रश्न सातत्याने लावून धरला असून, याच वृत्ताची दखल घेत व मनपा प्रशासनाचे लक्ष मोकाट कुत्र्यांच्या समस्येकडे वेधण्यासाठी मंगळवारी मनपा स्थायी समितीची सभा सुरू होण्याआधी शिवसेना नगरसेवक प्रशांत नाईक व भाजपचे नगरसेवक नवनाथ दारकुंडे यांनी मनपा आयुक्तांना चक्क कुत्र्यांची पिल्ले भेट देत प्रशासनाचा निषेध नोंदवला. दरम्यान, मनपाने मोकाट कुत्र्यांची समस्या सोडवली नाही, तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही नगरसेवकांनी दिला.
स्थायी समितीच्या सभेला सुरुवात होण्यापूर्वीच सत्ताधारी भाजपचे नगरसेवक नवनाथ दारकुंडे आणि शिवसेनेचे नगरसेवक प्रशांत नाईक यांनी शहरातील मोकाट कुत्र्यांच्या समस्येसंदर्भात आयुक्तांची भेट घेऊन या प्रश्नी तोडगा काढण्याची विनंती केली. मोकाट कुत्र्यांच्या समस्येबाबत वेळोवेळी पाठपुरावा करूनदेखील प्रशासन कोणत्याही प्रकारची कार्यवाही करीत नसल्याने त्यांनी संताप व्यक्त केला. या समस्येकडे प्रशासनाचे लक्ष केंद्रित व्हावे म्हणून त्यांनी आयुक्तांना थेट कुत्र्यांची पिल्ले भेट दिली. दोन्ही नगरसेवकांच्या या भूमिकेमुळे सभागृह अवाक् झाले. आयुक्तांनी नगरसेवकांना ही पिल्ले आणलेल्या जागेवर पुन्हा सोडावीत, अशी विनंती केली. तसेच ही पिल्ले घेण्यास आयुक्तांनी नकार दिला.
नगरसेवकांचा संताप
१. माणसांची काहीच किंमत नाही का?
शहरात मोकाट कुत्र्यांचा प्रश्न गंभीर होत आहे. सप्टेंबर महिन्यात ६ महिन्यांचा बाळाचा कुत्र्यांचा हल्ल्यात मृत्यू झाला. एका व्यक्तीचा जबडा कुत्र्यांनी तोडला. नागरिकांना लहान मुले घेऊन बाहेर फिरता येत नाही, अशी परिस्थिती असतानाही कुत्र्यांचा बंदोबस्त केला जात नसेल तर भविष्यात शहरात कुत्रे व मनुष्यांमध्येच संघर्ष होईल, तसेच मनपाला माणसांपेक्षा कुत्र्यांची जास्त काळजी आहे का, असा प्रश्न उपस्थित केला.
२. ...तर विष देऊन कुत्र्यांना मारण्याची वेळ येईल
नगरसेवक नवनाथ दारकुंडे व प्रशांत नाईक यांनी आयुक्तांसमोर संताप व्यक्त केला. कोणत्याही प्राण्याचा जीव हा महत्त्वाचा आहे. मात्र, प्राण्यांची संख्या जर वाढत जात असेल तर हे प्राणी मनुष्यासाठी धोकेदायक ठरतात. मनपा जर कोणत्याही उपाययोजना करीत नसेल तर नाइलाजास्तव नागरिकांवर सुरक्षिततेसाठी कुत्र्यांना विष देऊन मारण्याची वेळ येईल, असेही प्रशांत नाईक यांनी सांगितले.
आरोग्य अधिकाऱ्यांना आले हसू, अन् आयुक्तांचा चढला पारा
मोकाट कुत्र्यांच्या समस्येसंदर्भात नगरसेवक आक्रमकपणे प्रश्न उपस्थित करीत असताना, तसेच आयुक्तांना कुत्र्यांची पिल्ले भेट देत आयुक्तांचा कड्या शब्दांत पाणउतारा करीत असताना मनपाचे आरोग्याधिकारी पवन पाटील यांनी याबाबत कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. त्यातच कुत्र्यांची पिल्ले आयुक्तांना नगरसेवकांनी भेट देत असतानाच आरोग्य अधिकाऱ्यांना हसू आवरले गेले नाही. त्यामुळे आयुक्तांचा चांगलाच पारा चढला. त्यांनी पवन पाटील यांना उद्देशून, तुमच्या नाकर्तेपणामुळे मला रोषाला सामोरे जावे लागत असल्याचे सांगत, शहरातील प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष द्या, अशा शब्दांत आरोग्य अधिकाऱ्यांची खरडपट्टी काढली.
खासदारांकडे प्रश्न मांडणार
शहरात मोकाट कुत्र्यांच्या निर्बीजीकरणाचे काम गेल्या काही महिन्यांपासून थांबले आहे. हे काम अमरावतीच्या ॲनिमल वेल्फेअर संस्थेला देण्यात आले होते. परंतु, प्राणिमित्रांनी घेतलेल्या आक्षेपांमुळे हे काम थांबविण्यात आले आहे. याबाबत मनेका गांधी यांनी विशेष लक्ष घालत जिल्हाधिकाऱ्यांना याबाबतचे पत्र पाठविले होते. मनेका गांधी यांना शहरातील मोकाट कुत्र्यांची समस्या दाखवा, त्यांचा प्राण्यांबद्दलचा पुळका चांगला असला तरी माणसे या ठिकाणी मरत आहेत. याकडेही त्यांचे लक्ष वेधा, अशा शब्दांत सर्वच नगरसेवकांनी मनपा आयुक्तांकडे पाठपुरावा करण्याची मागणी केली. याबाबत खासदार उन्मेष पाटील यांच्याकडे प्रश्न मांडून केंद्राकडे पाठपुरावा करण्याची मागणी केली जाईल, अशी माहिती आयुक्तांनी या वेळी दिली.